हिवाळ्यातील काळजी

हिवाळ्यातील आरोग्याची काळजी

आत्तापर्यंत हिवाळ्यात काय खावे, त्वचेची काळजी कशी घ्यावी या विषयी माहिती आपण पाहिली परंतु जनरल केअर किंवा सर्वसाधारण काळजी काय घ्यावी याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत .

हिवाळ्यात हवा कोरडी झाल्यामुळे शरीरात रुक्षता वाढते शरीरातील कफदोष कमी होतो परिणामी बऱ्याच जणांना या दिवसात काही कारण नसताना कोरड्या खोकल्याचा त्रास होतो. यासाठी सकाळी मध आणि आल्याचा रस हे चाटण घ्यावे. तोंडामध्ये ज्येष्ठमधाचा तुकडा किंवा लवंग चघळावी. सकाळी पिण्यासाठी गरम पाणी वापरावे. दही, ताक, लिंबू , लोणची इत्यादी आंबट पदार्थांचा वापर टाळावा. तसेच थंड पदार्थ खाऊ नयेत. जेवताना गरम, पातळ पदार्थ आहारात असतील असे पहावे. गरम सूप कढी किंवा वरणाचे वेगवेगळे प्रकार यांचा समावेश करावा.

ताजे व गरम जेवण घ्यावे. या दिवसांमध्ये बाजारात विविध प्रकारच्या ताज्या पालेभाज्या मिळतात. मेथी, पालक, शेपू , अंबाडी, चुका, चाकवत, चंदन बटवा, करडई अशा असंख्य भाज्यांचे प्रकार मिळतात त्यांचा जरूर आस्वाद घ्यावा.

गरम भाकरी पातळ भाजी सोबत खाण्यास हरकत नाही फक्त वयोवृद्ध व्यक्तींनी कोरडी भाकरी खाणे ऐवजी भाकरीला तूप किंवा लोणी लावून खावे. सकाळी ज्यावेळी चांगली भूक लागेल त्यावेळी भाताची पेज, नाचणीची पेज, रव्याची खीर असे पातळ पदार्थ विशेषतः वृद्ध व्यक्तींनी अवश्य खावेत. यामुळे दुपारच्या जेवणासाठी अग्नी चांगला प्रज्वलित होतो. लहान मुले व तरुण व्यक्ती यांनी सुक्या मेव्याचे लाडू किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स खाण्यास हरकत नाही. बाजारात मिळणारी सीजनल फळे म्हणजे संत्री, बोरे, स्ट्रॉबेरीज खाण्यास हरकत नाही. ताजा हरभरा, गाजर, ताजे वाटाणे यासारखा मेवा आहारात अवश्य ठेवावा. अशाप्रकारे त्या त्या ऋतूत मिळणारी फळे, भाज्या यांचा आहारात वापर केल्यास आपले स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते.

हिवाळ्यातील त्वचेची काळजी

हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी पडायला लागते यासाठी आहारात स्निग्ध पदार्थांचा समावेश आपण करतोच परंतु त्वचेची निगा राखण्यासाठी काही सोपे बाह्य उपचार देखील करणे गरजेचे आहे. यासाठी अगदी घरात असणारे साहित्य देखील आपण वापरू शकतो. प्रत्येकाच्या घरात खोबऱ्याचे तेल असतेच. शक्यतो रात्री झोपताना खोबऱ्याचे तेल गरम करून हलक्या हाताने संपूर्ण शरीराला थोडे थोडे तेल लावून ते जिरवून टाकावे रात्री झोपताना शक्य नसेल किंवा तेलकट वाटत असेल तर सकाळी अंघोळीपूर्वी किमान अर्धा तास अंगाला तेल चोळावे. खोबरेल तेलाच्या ऐवजी तिळाचे तेल कोमट करून वापरू शकतो. परदेशात ज्या ठिकाणी तिळाचे अथवा खोबऱ्याचे तेल उपलब्ध होऊ शकत नाही त्या ठिकाणी ऑलिव्ह ओईल किंवा बदामाचे तेल हे देखील वापरू शकतो.

तेल लावणं ही खूप किचकट प्रक्रिया आहे तसेच खूप वेळ खाऊ आहे असा आपला समज असतो परंतु नियमितपणे तेल लावल्यास खूप रगडण्याची गरज नसते. ज्यावेळेस हाताशी भरपूर वेळ असेल अशावेळी मुद्दाम थोडा मसाज करायला हरकत नाही परंतु दररोज थोडे थोडे तेल त्वचेत जिरवायचे असल्यास दहा मिनिटांचा कालावधी पुरेसा होतो. अंघोळीपूर्वी तेल लावल्यास त्वचेवर जास्त झालेले तेल काढून टाकण्यासाठी आपण हरभऱ्याच्या डाळीचे पीठ किंवा मसूर डाळीचे पीठ थोडीशी हळद टाकून वापरू शकतो. ज्यांची त्वचा थोडी रुक्ष आहे किंवा कोरडी पडते त्यांनी या मिश्रणात थोडी दुधावरील साय मिसळावी.

त्वचा अधिक मुलायम व्हावी असे वाटत असेल तर तीळ थोडेसे भाजून त्याची पूड त्वचेवर घासावी यामुळे त्वचा अतिशय मुलायम व तजेलदार होते यानंतर गरम पाण्याने स्नान करावे. जर तिळाची पावडर अंगाला लावली किंवा डाळीचे पीठ व हळद असे मिश्रण अंगाला लावले तर थंडीच्या दिवसात साबण नाही वापरला तरी चालते. कारण साबणाच्या वापरामुळे त्वचेतील तेल, ओलावा कमी होतो व त्वचा रुक्ष होत जाते त्यामुळे थंडीत त्वचेतील स्नेह व तेज कायम राखण्यासाठी तेल व तिळाचे चूर्ण यांचा वापर अवश्य करावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडावेळ फिरल्यास ड जीवनसत्व तयार होण्यास मदत होते व हाडे ही बळकट होतात.

हिवाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी

हिवाळ्यात नळाला येणारं पाणी अगदी थंड असतं. अशा थंड पाण्याने जर रोजची सकाळची कामे केली तर शरीराला त्या गारठ्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे किमान सकाळच्या वेळी तरी सर्व कामांसाठी गरम पाण्याचा वापर करणे आपल्या शरीरासाठी हितकारक आहे.

सकाळच्या तोंड धुणे, शौच, मुखमार्जन अशा सर्व कामांसाठी गरम पाणी वापरावे. सकाळच्या वेळात गार पाण्यातील कामे करणे टाळावे. भांडी घासणे, कपडे धुणे फरशा पुसणे ही सर्व कामे एक तर गरम पाण्यात करावीत किंवा दुपारी पाणी थोडे कोमट झाल्यानंतर करावी.

पिण्यासाठीही कोमट पाणी वापरावे. या सर्व कामांसाठी गार पाणी वापरल्याने काय नुकसान होतं असं आपल्याला वाटतं परंतु असे थंड पाणी रोज वापरल्यामुळे शरीरात वातदोष वाढतो त्यामुळे अंगदुखी सांधेदुखी अशा स्वरूपाचे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे स्वतःच्या शरीराची वेळीच काळजी घेण्याच्या दृष्टीने गरम पाणी वापरणे हितावह आहे.

वैद्य राजश्री कुलकर्णी – M.D.( आयुर्वेद)