आता हळूहळू थंडी वाढत चालली आहे. गारठा आणि कोरडी हवा यामुळे तब्येतीच्या काहींना काही तक्रारी या दिवसांत उद्भवतात . आजारी पडू नये म्हणून काय काळजी घ्यावी ते पाहूया !
आहार –
आरोग्य मोठ्या प्रमाणात आहारावर अवलंबून असते त्यामुळे आहाराची काळजी घेणे आणि ऋतूनुसार त्यात इष्ट तो बदल करणे आवश्यक आहे.
हवा थंड व रुक्ष झाल्यामुळे त्वचा व एकूणच शरीराला खूप कोरडेपणा येतो त्यामुळे त्याचा उतारा म्हणून स्निग्ध पदार्थ आहारात समाविष्ट करणं गरजेचं आहे.
महाराष्ट्रात सगळीकडे या दिवसांत थंडीचे खास लाडू करण्याची पद्धत आहे. यामध्ये प्रामुख्याने खोबरं, खारीक ,उडीदाचं पीठ,कणीक यांचा वापर केला जातो.
या लाडू मध्ये बदाम,काजू,पिस्ते,अक्रोड ,जर्दाळू असे सगळे सुक्या मेव्यातील पदार्थ टाकले जातात कारण ते पौष्टिक असतात त्याच बरोबर स्निग्ध असतात कारण यातील प्रत्येक पदार्थांत मोठ्या प्रमाणावर स्निग्ध पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात.
थंडीमुळे पाठ,कंबर आखडणे,दुखणे, अचानक उसण भरणे असे त्रास वातामुळे होतात ,ते होऊ नयेत म्हणून लाडू मध्ये डिंक,मेथ्या, अळीव यांचाही वापरले केला जातो कारण ही एक प्रकारची खाण्याच्या पदार्थांमधली औषधेच आहेत!
लाडू बांधताना त्यात गायीचं तूप आणि गूळ यांचा वापर केला जातो. तूप स्निग्ध असल्याने कोरडेपणा कमी करण्यासाठी उपयोग होतो तर गूळ उष्ण असल्याने शरीरातील ऊब टिकवून ठेवतो.
पुढे जानेवारीत थंडी अजून बोचरी होते कारण खूप वारा सुटतो, त्वचा तडतडते अशावेळी संक्रांतीच्या वेळी तिळगूळ खाण्याची पद्धत शास्त्रीय आहे, तीळ, गूळ, तूप आणि क्वचित त्यात शेंगदाणे मिक्स करून बनवले जाणारे लाडू लहान मुलांना अवश्य द्यावे.
सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट, खारीक, खोबरं, तीळ या सगळ्या पदार्थांमुळे मुलांची हाडे,स्नायू बळकट होण्यास मदत होते.
थंडीत गूळ पोळी करायची पद्धतही योग्य आहे, तीळ आणि गूळ घालून केलेली पोळी भरपूर तूप लावून खावी.
रात्री झोपताना दुधात तूप घालून प्यावे कारण या दिवसांत आतडी कोरडी पडल्याने मलावष्टंभ, मूळव्याध, संडासचे वेळी रक्त पडणे या तक्रारी डोकं वर काढतात ,त्यांना दूध तूप या संयोगाने चांगला प्रतिकार करता येतो.
प्यायला गरम पाणी वापरावे म्हणजे अग्नी चांगला प्रज्वलित राहतो.
विहार –
हिवाळा हा व्यायाम, कसरत करण्याचा ऋतू समजला जातो कारण या दिवसांत शरीराची क्षमता चांगली असते, अग्नी तीक्ष्ण असल्याने आहार चांगला असतो भरपूर चालणं, जॉगिंग, रनिंग, स्कीपिंग यापैकी जो व्यायाम आपल्या वयाला, वजनाला झेपेल तो करावा.
त्वचा कोरडी पडू नये तसेच हाडे,सांधे दुखू नयेत म्हणून रोज न चुकता अंगाला कोमट तेलाने मसाज करावा.
मालिश करण्यासाठी औषधी सिद्ध तेल असेल तर उत्तमच ,अन्यथा अगदी तिळाचं, खोबऱ्याचं तेलही चालेल.
अंघोळीसाठी चांगलं गरम पाणी वापरावं, त्याचबरोबर जास्त थंडी असताना तोंड धुणे,शौच व इतर कामांसाठी देखील गरमच पाणी वापरावं.
थंडीपासून संपूर्ण शरीराचं रक्षण करणे गरजेचे आहे त्यामुळे उबदार कपडे,स्वेटर, शाल वगैरे तर हवेच पण पायही लांब कपडे घालून उबदार ठेवावेत. कानाला टोपी किंवा रुमाल बांधावा, पायात मोजे घालावेत.
हिवाळ्यात फरशी खूप थंड पडते व गारवा शरीरात मुरतो म्हणून पायात रबरी स्लीपर्स,चप्पल वापराव्या.
पुरेशी झोप घ्यावी.
पंचकर्म –
संधिवात, हाडं दुखणं, कंबर आखडणे, मान दुखणे, स्नायू आखडणे व दुखणे अशा तक्रारी थंडीमध्ये शरीरात वात दोष वाढल्यामुळे निर्माण होतात. वातावरणात वाढलेला कोरडेपणा आणि गारवा दोन्ही गोष्टी वात वाढवण्यास कारणीभूत ठरतात. वाढलेला वात नियंत्रणात आणायचा असेल तर या दिवसांत “बस्ति कर्म” करुन घेणे आवश्यक आहे.
यामध्ये आधी संपूर्ण अंगाला तेलाने अभ्यंग करुन, स्नेहन करुन नंतर वाफारा दिला जातो व औषधी तेल, काढे इ. वापरून बस्ती दिला जातो. वात दोष नियंत्रणात आल्यामुळे वेदना एकदम कमी होतात व कडक झालेले, आखडलेले स्नायू मृदु व मोकळे होतात.
आपल्या आहार,विहार व पंचकर्म विषयक सल्ल्यासाठी आजच संपर्क साधा.