लहान मुलांच्या व्यायाम विषयी माहिती आपण पाहिली. मध्यम वयातील व्यक्तींनी काय स्वरूपाचा व्यायाम करावा ते आज आपण पाहणार आहोत. मध्यम वयातील व्यक्ती याचा अर्थ साधारण तरुण ते प्रौढ वयोगट असा गृहित धरला आहे.
तरुण वयातील मुले मैदानी सर्व खेळ खेळू शकतात. क्रिकेट ,फुटबॉल, बास्केट बॉल इत्यादी सर्व खेळ तरुण वयातील मुले सहज खेळू शकतात. जिम मध्ये जाऊन सर्व प्रकारचा व्यायाम करू शकतात, भरपूर घाम गाळू शकतात. सायकलिंग ,रनिंग, जॉगिंग, स्विमिंग इत्यादी स्वरूपाचे व्यायाम देखील त्यांना सहज जमतात. अधून मधून जवळपासच्या डोंगरांमध्ये ट्रेकिंगसाठी देतील जाऊ शकतात. घरात करण्याच्या व्यायामा मध्ये सूर्यनमस्कार हा सर्व वयोगटातील लोकांसाठी उत्तम व्यायाम आहेच!
साधारण चाळिशीच्या पुढच्या वयोगटातील स्त्री-पुरुष दोघांसाठी सूर्यनमस्कार, योगासने त्याचप्रमाणे प्राणायाम व ओंकार हे फार फायदेशीर ठरतात. घराबाहेर करायच्या व्यायाम प्रकारामध्ये फिरायला जाणे हा उत्तम व्यायाम प्रकार आहे फक्त यामध्ये चालण्याची गती जलद राखता यायला हवी कारण ग्रुपमध्ये गप्पाटप्पा करत फिरायला गेल्यास त्याचा व्यायाम म्हणून काही उपयोग होत नाही. ते केवळ मानसिक रिलॅक्सेशन ठरते. परंतु व्यायाम म्हणून फिरायला जायचं असेल तर मिनिटाला 120 पावले अशा किमान गतीने चालायला हवे. अशा पद्धतीने चालल्यास हृदयाची गती चांगल्या पद्धतीने वाढते तसेच शरीराच्या सर्व स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो.
ब्लड प्रेशर ,डायबिटीस किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे शारीरिक आजार असतील तर वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही व्यायाम कोणत्याही व्यक्तीने करू नयेत कारण हृदयाची गती वाढणे, रक्तप्रवाह वाढणे , श्वसन गती वाढणे असे जे बदल व्यायाम करताना घडत असतात ते काही ठराविक स्वरूपाच्या आजारांमध्ये हितकर नसतात. त्यामुळे आपले वय, वजन, काही आजार असल्यास त्यांचा इतिहास व आपल्या कामाचे स्वरूप हे सर्व आपल्या डॉक्टरांशी डिस्कस करून त्यानुसार व्यायामाचा प्रकार ठरवावा .
जर वय कमी असेल कोणत्याही स्वरूपाचा त्रास नसेल तर आपल्या इच्छेनुसार व वेळेनुसार व्यायाम निवडता येतील. व्यायाम करण्याचा एक सर्वसाधारण नियम आयुर्वेदाने सर्वांसाठी सांगून ठेवला आहे तो म्हणजे अर्ध शक्ती व्यायाम करावा याचा अर्थ तुम्ही जर पन्नास जोर-बैठका काढू शकत असाल तर प्रत्येक वेळी तितकाच व्यायाम करायला हवा असे नाही आपल्या शक्तीच्या काही कमी प्रमाणात व्यायाम करावा म्हणजे त्यातील सातत्य टिकून राहते अन्यथा पहिल्या दिवशी चार किलोमीटर पळून आल्यानंतर पुढचे आठ दिवस पाय दुखतात म्हणून व्यायामाला बुट्टी देणारे लोक आपण नेहमीच पाहतो.
दुसरा नियम म्हणजे ऋतू कोणताही असो, कपाळावर घाम यायला हवा याचाच अर्थ उन्हाळ्यात कमी तर हिवाळ्यात भरपूर व्यायाम करायला हवा, कारण उन्हाळ्यात बाहेरचे तापमान जास्त असल्यामुळे घाम पटकन येतो तर हिवाळ्यात कपाळावर घाम येण्यासाठी पुष्कळ शारीरिक कसरत करावी लागते. व्यायामाचे हे नियम पाळल्यास कोणताही त्रास न होता वर्षाचे बाराही महिने नियमितपणे व्यायाम करणे सहज शक्य आहे.
वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)