हिवाळा हा ऋतू शरीर कमवण्याचा समजला जातो बहुतेक लोक उन्हाळा किंवा पावसाळा या ऋतूं पेक्षा हिवाळ्यामध्ये व्यायाम करणे प्रेफर करतात. हिवाळ्यामध्ये शरीराला घाम येण्याचे प्रमाण अतिशय कमी असते त्यामुळे पुष्कळ लोकांचा उत्साह टिकून राहतो. सर्वसाधारणपणे जिम मध्ये जाऊन व्यायामाचे विविध प्रकार किंवा वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे वापरून त्याद्वारे केले जाणारे व्यायाम हे तरुण पिढीत विशेष लोकप्रिय आहेत. परंतु लहान मुले ज्यांना जिम मध्ये जाऊन करण्याचे व्यायाम फारसे हितकर नाहीत किंवा अशा स्वरूपाचे व्यायाम विशिष्ट वयापूर्वी करण्याची परवानगी नाही अशा मुलांसाठी दोन-तीन प्रकारचे सोपे व्यायाम याठिकाणी सुचवत आहे.
त्यातील पहिला प्रकार हा सूर्यनमस्कारांचा आहे. सूर्यनमस्कार घालताना शरीराची जी विशिष्ट प्रकारची स्थिती होते त्यामध्ये किमान दहा प्रकारची वेगवेगळी योगासने केली जातात. यामध्ये शरीराच्या सर्व स्नायूंना ताण देणे आणि शिथिल सोडणे या क्रिया केल्या जातात. या क्रिया करताना त्यासोबत श्वसनाचे नियंत्रण जर मुलांना शिकवले तर फुफ्फुसांसाठी तो अतिशय उत्तम व्यायाम ठरतो. जमिनीपासून वर जाताना श्वास घेणे आणि जमिनीकडे जाताना श्वास सोडणे इतक्या साध्या प्रक्रिया जरी सूर्यनमस्कार घालताना केल्या गेल्या तरी त्याचे खूप फायदे मिळतात.
दुसरा व्यायाम प्रकार जो कमी वेळात भरपूर फायदे मिळवून देतो तसेच लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो तो म्हणजे दोरीवरच्या उड्या! अगदी पन्नास उडयां पासून सुरुवात करून प्रत्येकाच्या क्षमतेनुसार तीनशे ते पाचशे उड्यादेखील मुले मारू शकतात .यामुळे विशेषतः हृदयाला चांगला व्यायाम मिळतो. पायाचे व मांडीचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.
तिसरा व्यायाम प्रकार हा सायकलिंगचा आहे ज्यांच्याजवळ सायकल आहे ती मुले त्यांचा वेळ व क्षमता यानुसार सायकल चालवू शकतात यामुळे देखील संपूर्ण शरीराला व्यायाम होतो पायाचे स्नायू बळकट होतात त्याच वेळी लक्षपूर्वक सायकल चालवणे मुळे कॉन्सन्ट्रेशनही वाढते.
ज्या मुलांना सायकल उपलब्ध नाही किंवा व्यायामासाठी फार वेळ काढू शकत नाही अशी मुले जिन्याची चढ-उतर करण्याचा व्यायाम करू शकतात 30 ते 50 पायऱ्या एकावेळी आठ ते दहा वेळा खाली वर चढल्या उतरल्याने हृदयाला चांगला व्यायाम होतो.
लहान वयात मोकळ्या हवेत खेळण्याचे वेगळेच महत्त्व आहे .ज्या मुलांना घराच्या आसपास मोकळी मैदाने आहेत त्यांनी क्रिकेट, फुटबॉल अशा प्रकारचे खेळ खेळण्यास हरकत नाही .याखेरीज कबड्डी, खोखो यासारखे देशी खेळ देखील अवश्य खेळावेत. पळापळी, जोडसाखळी यासारख्या खेळांमध्ये संघ भावना जागृत होण्यासही मदत होते. थोडक्यात लहान मुले एकमेकांसोबत खेळली तर मुलांची शारीरिक तसेच मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. त्यामुळे पालकांनीदेखील केवळ अभ्यास अभ्यास असे न करता मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. यातूनच पुढे वेगवेगळ्या खेळांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू निर्माण होतात.
वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)