पोट साफ न होणे

गेली जवळ जवळ तीन दशकं आम्ही वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहोत.रोज पेशंट्सशी बोलताना त्यांचं डेली रुटीन काय असतं, आहार काय घेतात ,झोप,व्यायाम ,बॉवेल मूव्हमेंट्स वगैरे चौकशी करताना बहुसंख्य पेशंट्स “ पोट काही विशेष म्हणावं असं साफ होत नाही “ अशी तक्रार करतात.त्यातही बरेच प्रकार असतात म्हणजे, पोट पूर्ण रिकामं झालं असं वाटत नाही, दिवसातून एकदाच जावं लागतं, जाण्याची वेळ फिक्स नाही,दिवसभरात कधीही जावं लागतं, रोज होतच नाही, एक दिवसांआड किंवा त्याहूनही अधिक दिवसांनी जावं लागतं, मल प्रवृत्ती कठीण होते, खडे होतात,जोर करावा लागतो, खूप वेळ बसावं लागतं, पोट दुखतं, पोट फुगते अशा अनेक तक्रारींना लोकं साफ न होणे, मलावष्टंभ किंवा हल्लीच्या सोफेस्टिकेटेड भाषेत कॉन्स्टिपेशन होतंय म्हणून वर्णन करतात.

या सगळ्या गोष्टी वर वर पहाता एकच वाटतात पण त्यात थोडा थोडा फरक आहे जो समजून घेतला पाहिजे. मलप्रवृत्ती रोज सकाळी उठल्यावर लगेच व विनासायास होणं हे उत्तम आरोग्याचं निदर्शक आहे.ही नैसर्गिक प्रक्रिया आहे .शरीराला नकोसे असणारे टाकाऊ पदार्थ मल, मूत्र व घाम याद्वारे शरीराबाहेर टाकले जातात. मूत्र आणि घाम याद्वारे द्रवपदार्थ बाहेर टाकले जातात परंतु घन मल मात्र मलप्रवृत्ती द्वारेच शरीराबाहेर टाकता येतो. मलप्रवृत्ती कशी होणार हे काही महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून असते.तुमची प्रकृती कशी आहे, आहार कशा स्वरुपाचा आहे ,पाणी किंवा इतर द्रवपदार्थ यांचा इनटेक किती आहे, आहारात स्निग्ध पदार्थ कितपत असतात,प्रवास,जागरण वगैरे गोष्टी किती असतात अशा अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. यात व्यक्तिपरत्वे फरक असू शकतो पण तरीही सकाळी उठल्यावर लगेच वेग येणं हे चांगलं आरोग्य असण्याचं लक्षण आहे .

सकाळी एखादी व्यक्ती किती वाजता उठते हेही महत्वाचं आहे. पहाटे चार वाजल्यापासून ते साधारण सात वाजेपर्यंत शरीरात वात दोषाचा प्रभाव किंवा जोर असतो ,मग पहाटे जितकं लवकर उठलं जाईल तितकं पोट पट्कन साफ होतं. सात वाजेनंतर मात्र शरीरात कफ दोषाचा प्रभाव वाढू लागतो आणि मग वेगही येत नाही व मुद्दाम गेलं तरी पोट नीटसं साफ होत नाही, पुन्हा जाण्याची संवेदना जाणवत राहते.त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे.

बऱ्याच जणांचा असा समज असतो की दिवसातून दोन तीन वेळा शौचास जाणं म्हणजे हेल्दी लक्षण आहे पण हे साफ चुकीचं आहे. जर आपली पचनशक्ती उत्तम असेल ,आहार योग्य प्रकारे व योग्य प्रमाणात घेतला जात असेल तर पचन पूर्ण झाल्यावर शरीराला आवश्यक असणारे घटक आतड्यातून शोषून घेतले जातात आणि नको असलेला भाग पुढे बाहेर टाकण्यासाठी मोठ्या आतड्याकडे ढकलला जातो.सकाळी एकदाच मलप्रवृत्ती साठी गेलं आणि मल विसर्जन एकदाच व्यवस्थित झालं तर पुन्हा पुन्हा जावं लागत नाही व ते चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे ,त्यामुळे उगीचच भ्रामक कल्पना मनाशी बाळगून बळजबरीने दोन तीन वेळा जात राहणं किंवा जोर करणं चुकीचं आहे !

पुढील भागात योग्य मलप्रवृत्ती कशी असते व पोट साफ व्हावे म्हणून नियमित काय गोष्टी कराव्यात हे जाणून घेऊ !