छोट्या तक्रारी पण लक्षवेधी

आपण रोज रात्री झोपतो ,सकाळी उठतो, दिवसभर आपलं जे रुटीन असेल ते फॉलो करतो, काम करतो, नोकरी करतो, जेवतो , ही सगळी कामे नित्यनेमाने करतच असतो पण बरेचदा कुठेतरी काहीतरी होतंय, दुखतंय,नॉर्मल नाहीये असं वाटत असतं पण जोपर्यंत काम अडत नाही तोपर्यंत आपण अशा छोट्यामोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतो. बरेचदा अशा गोष्टींमधूनच मोठ्या तक्रारी किंवा आजारांची पायाभरणी होत असते पण त्याविषयी माहिती नसल्याने आपण त्याकडे वेळेवर लक्ष देत नाही.

अशा तक्रारींची नुसती यादी करायची म्हटली तरी लांबलचक होईल. अगदी सकाळी उठल्यावर उत्साह वाटत नाही, झोप लवकर लागत नाही, पुरेशी होत नाही, वारंवार डोकं दुखतं, सकाळी नाकातून पाणी गळतं,खूप शिंका येतात, ब्रश करताना पित्त किंवा पिवळं पाणी पडतं, दात आंबतात,छातीत जळजळ होते,पोट साफ होत नाही, मळाचे खडे होतात,खूप गॅसेस होतात,ढेकर येतात,अंगाला खाज येते,भूक लागत नाही, खाल्ल्यावर पोट जड होतं, कंबर दुखते,टाचा दुखतात, डोळ्यांची आग होते, हाता पायांना मुंग्या येतात अशा एक ना अनेक तक्रारी ! या तक्रारी महिनोन्महिने सुरु असतात पण त्यासाठी लगेच उठून कोणी डॉक्टर कडे जात नाही.बहुसंख्य वेळा होईल आपोआप बरं, अमुक गोष्टीमुळे झालं असेल किंवा कर काहीतरी घरगुती उपाय असा मार्ग स्वीकारला जातो .जेव्हा एखादी गोष्ट खूपच त्रास देऊ लागते तेव्हा मग त्याकडे नाईलाजाने लक्ष दिले जाते.

वास्तविक पाहता जेव्हा एखादं लक्षण किंवा तक्रार वारंवार जाणवत असते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की शरीर आपल्याला काहीतरी सिग्नल किंवा संकेत देण्याचा प्रयत्न करत असतं जेणेकरून तो त्रास गंभीर रुप धारण करु नये पण नेमकी इथेच चूक होते आणि त्रास वाढत जातो .अशा नियमित आढळणाऱ्या अनेकविध तक्रारींबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तेही समजून घेणार आहोत!

चला तर मग,भेटूया पुढच्या भागात !

वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)