प्रत्येक व्यक्तीला शरीराची ताकद टिकवून ठेवण्यासाठी झोपेची गरज असतेच. आपापल्या कामाच्या स्वरूपानुसार तसेच वयानुसार ही गरज कमी-अधिक असू शकते. आपल्या शरीराला दोन प्रकारे एनर्जीचा पुरवठा होत असतो. एक आहाराच्या द्वारे आणि दुसरा झोपे द्वारे! ज्याप्रकारे दिवसभरात ठराविक वेळी, ठराविक प्रमाणात आहार घेणे स्वास्थ्य टिकवण्यासाठी गरजेचे आहे, त्याच प्रमाणे रात्रीची झोप हीदेखील आवश्यक आहे.
लहान मुले तसेच वृद्धांच्या बाबतीत झोपेचे समीकरण थोडे बदलते. लहान मुलांची वाढ झोपेतही होत असते त्यामुळे त्यांना मोठ्या माणसांपेक्षा जास्त झोपेची गरज असते. म्हातारपणात शरीराची झीज मोठ्या प्रमाणात होत असते म्हणून याही वयात झोपेची गरज अधिक असते.
केव्हा झोपावे याबाबतीत आयुर्वेदाने मार्गदर्शन केलेले आहे. लहान मुले दिवसातील पुष्कळ वेळ झोपलेली असतात. विशेषतः वर्ष ते दोन वर्षाची मुले जास्त वेळ झोपतात नंतर हळूहळू हा झोपेचा कालावधी कमी होत जातो मग दुपारची झोप ही त्यांच्यासाठी तास दोन तासाची पुरेशी असते. लहान वयात रात्रीची झोप मात्र आठ ते दहा तासांची आवश्यक असते. तरुण वयात दुपारच्या झोपेची गरज नसते. रात्री सहा ते आठ तासांची झोप पुरेशी आहे.
तरुण वयात फक्त आजारी असताना किंवा गरोदर स्त्रियांना दुपारी झोपण्यास हरकत नाही. दुपारी झोपण्याचे देखील काही नियम आहेत दुपारचं जेवण झाल्यानंतर जर झोपले तर त्यामुळे वजन वाढते तसेच पचनावर परिणाम झाल्यामुळे गॅसेस होणे, ढेकर येणे, ऍसिडिटी वाढणे यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे दुपारी जर झोपायचं असेल तर जेवणापूर्वी थोडावेळ झोपायला हरकत नाही. जर काही कारणाने रात्री जागरण झाले असेल तर दुपारच्या वेळी रात्री जितका वेळ जागलो आहोत त्याच्या अर्धा वेळ झोपल्यास हरकत नाही. म्हणजे समजा, नेहमीपेक्षा दोन तास झोपायला उशीर झाला असेल तर दुसऱ्या दिवशी जेवणापूर्वी दुपारी एक तास झोप घ्यायला हरकत नाही.
ज्या लोकांना नेहमीच रात्रपाळी करावी लागते त्या लोकांना झोपेचे काही विशिष्ट नियम पाळल्यास तब्येतीवर होणारे दुष्परिणाम टाळता येतात. या लोकांनी पहाटे अथवा सकाळी कामावरून परत आल्यानंतर अंगाला खोबऱ्याचे अथवा तिळाचे तेल कोमट करून लावावे व कडकडीत पाण्याने अंघोळ करावी, त्यानंतर एक ग्लास दूध त्यामध्ये गाईचे तूप दोन चमचे टाकून प्यावे व नंतर सलग चार तास झोपावे त्यानंतर उठून जेवण करावे व पूर्ण दिवस शक्यतो झोपू नये. या व्यक्ती जर प्रौढ वयातील असतील तर दुपारी चारच्या सुमारास पुन्हा एकदा तास दोन तास झोपण्यास हरकत नाही.
विद्यार्थीदशेत बरेच जण अभ्यासासाठी रात्री जागतात. त्यावेळी आसपास शांतता असल्यामुळे अभ्यास चांगला होतो असे ते म्हणतात परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने रात्री जागून केलेल्या अभ्यासापेक्षा पहाटे उठून केलेला अभ्यास जास्त चांगल्या प्रकारे होतो व लक्षातही राहतो. याचे कारण म्हणजे पहाटे आपण जेव्हा लवकर उठू त्यावेळी हवा शुद्ध असते, वातावरण प्रसन्न असते, मनात सत्वगुण अधिक प्रमाणात असतो. झोप झालेली असल्यामुळे मन व शरीर दोन्ही ताजेतवाने असतात. मनात कोणतेही विचार नसतात याउलट रात्री जागून अभ्यास केल्यास दिवसभराचा एक प्रकारचा शीण, थकवा हा मनावर असतो, तसेच दिवसभरात घडलेल्या घटनांचा कळत नकळत मनावर परिणाम झालेला असतो त्याचा परिणाम मनाच्या एकाग्रतेवर अधिक होतो त्यामुळे रात्री जागण्यापेक्षा पहाटे उठणे केव्हाही चांगले !
गर्भिणी स्त्रियांनी सकाळच्या वेळी घरातली थोडीफार कामे करायला हरकत नाही. त्यानंतर दुपारच्या जेवणापूर्वी थोडावेळ झोपण्यास हरकत नाही मात्र जेवण झाल्यानंतर केवळ आडवे पडावे, गाढ झोपू नये अन्यथा अन्न घशाशी येणे, छातीत जळजळ होणे अशा स्वरूपाचे त्रास जाणू शकतात.
एकंदरीत सर्वांनाच रात्रीची सहा ते आठ तासांची झोप पुरेशी असते. ज्या व्यक्ती नियमित व्यायाम करतात, योगासने प्राणायाम करतात त्यांना यापेक्षा कमी वेळेत चांगली विश्रांती मिळून लवकर जाग येते .पहाटे उठून केलेला अभ्यास किंवा व्यायाम किंवा कोणतेही काम हे अधिक प्रॉडक्टिव ठरते हे मात्र निश्चित! रात्री विनाकारण जागणे हे जसे वाईट तसेच उगीच जास्त वेळ झोपणे हेदेखील हानीकारक आहे. विशेषतः जाग आल्यानंतर उगीचच अंथरुणात लोळत राहणे हे अधिक वाईट. पुरेशी झोप झाल्यानंतर शरीर आणि मन प्रसन्न होते अशावेळी सकाळी उठून आपापल्या कामाला लागावे.