संक्रांत आणि तीळ

चौदा जानेवारी पासून सूर्याचं उत्तरायण सुरु होतं. हळूहळू थंडीची तीव्रता कमी व्हायला लागते आणि दिवसही मोठा होऊ लागतो. पण तरीही पुढे महिना दीड महिना थंडी असतेच ! उलट वारा जोरात वाहत असल्याने थंडी बोचरी जाणवते. त्वचा जास्त कोरडी होते, खाज येऊ लागते आणि त्वचा चरचरीत होते. त्यामुळे आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करायला हवा.

दिवाळीनंतर सुरु केलेले सुक्या मेव्याचे लाडू एव्हाना संपत आलेले असतात. अशा वेळी थंडीचा प्रतिकार व्हावा, त्याच वेळी शरीराला आवश्यक ती एनर्जी मिळावी आणि भूकही भागावी असे पदार्थ आपल्या पूर्वजांनी सुचवले आहेत.

तीळ हा आपल्या आहारातील एक असा स्निग्ध पदार्थ आहे जो चविष्ट आणि पौष्टिक असून शिशिर ऋतूतील थंडीसाठी उत्तम आहे. म्हणून भोगी आणि संक्रांत इथपासून ते पुढे रथसप्तमी पर्यंत तिळाचा मुबलक वापर आहारात करावा असा संकेत आहे.

भोगी : संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो. या दिवशी त्वचेची रुक्षता कमी करण्यासाठी अंगाला अंघोळीच्या वेळी भाजलेल्या तिळाची पावडर लावावी अशी पद्धत आहे, हे एकच दिवस न करता थंडी कमी होईपर्यंत म्हणजे किमान महाशिवरात्री पर्यंत तरी करावं. तिळातील नैसर्गिक स्निग्ध गुण आणि तेलामुळे त्वचा अगदी सुंदर स्निग्ध आणि मऊ, गुळगुळीत होते. तीळ चूर्ण रोज लावल्यास त्वचेला इतर कोणतेही कृत्रिम क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावायची गरज पडत नाही.

भोगीच्या दिवशी जेवणात तीळ लावलेली ज्वारी किंवा बाजरीची भाकरी लोण्या सोबत खायची पद्धत आहे तीही उत्तम स्निग्धता मिळावी म्हणूनच! थंडीच्या दिवसांत मिळणाऱ्या भरपूर ताज्या भाज्या म्हणजे गाजर, तुरीच्या शेंगांचे दाणे, हरभरे, मटारचे दाणे आणि तिळ घालून मुगाची डाळ आणि तांदुळाची गरमागरम खिचडी, त्यावर भरपूर साजूक तूप घालून खावी.

याच दिवसांत मिळणाऱ्या सगळ्या भाज्या एकत्र करून जी मिक्स भाजी बनवली जाते तिला भोगीची भाजी म्हणतात. यात अगदी वांगी, वाल पापडीच्या शेंगा इथपासून आपल्या आवडीनुसार कितीही भाज्या घालू शकतो. त्यातही तिळाचं, दाण्याचं कूट घालावं.

संक्रांत : प्रत्यक्ष संक्रांतीच्या दिवशी तर देवाच्या नेवैद्याला तिळगूळ ठेवून मग सर्वांना तिळगूळ देण्याची प्रथा आहे. तिळातील स्नेह आणि गुळातील गोडवा माणसा माणसांत वाढावा हा यामागील उदात्त हेतू होय. या पदार्थामधील स्निग्धता अधिक वाढावी म्हणून तिलगुळात शेंगदाणे, खोबरं, खसखस घालायचीही पद्धत आहे. शिवाय साजूक तूप आणि गूळ यामुळे तिळगूळ हा पदार्थ अतिशय चविष्ट लागतो

गुळाची पोळी हाही पदार्थ वर्षातून फक्त याचवेळी बनवून खाल्ला जातो कारण तीळ आणि गूळ यांची उष्णता बाहेरच्या थंडीमुळे शरीर सहन करू शकते. तीळ, खोबरं, खसखस, थोडे दाणे यांची खरपूस भाजून केलेली पूड, खमंग परतलेलं बेसन आणि गूळ यांचं मऊसूत सारण भरून केलेल्या खुसखुशीत गूळपोळ्या चवीला अप्रतिम लागतील यात काय शंका?

पूर्वी रसरसून पेटलेल्या कोळशाच्या शेगडीवर लोखंडी तवा ठेवून त्यात गावठी तीळ टाकून त्यावर चमच्याने थोडा थोडा साखरेचा पाक घालून सतत हलवून सुरेख चांदण्याप्रमाणे दिसणारा हलवा सुगरण स्त्रिया घरोघरी बनवत असत. हल्ली मशीनवर बनवला जातो. काही ठिकाणी तिळाची रेवडी, तीळ पट्टी बनवली जाते. साखर किंवा गूळ यांचा वापर करून कोणत्याही प्रकारे तीळ खाल्ले जावेत हाच यामागील हेतू आहे.

पुढे थंडी पूर्ण कमी होईपर्यंत किंवा किमान रथसप्तमी पर्यंत तरी तिळगूळ खाल्ला जावा म्हणून संक्रांतीचं हळदीकुंकू करायचीही पद्धत आहे. काळा रंग उष्णता शोषून, धरून ठेवणारा म्हणून थंडीशी प्रतिकार करणारा म्हणून या दिवसांत काळी साडी, काळे कपडे घालायची प्रथा पडली जी पूर्णतः शास्त्रीय आहे.

थोडक्यात सांगायचे तर हा एक दोन दिवस साजरा करायचा नसून किमान महिनाभर तरी करावा म्हणजे आपले स्वास्थ्य उत्तम राहील.

वैद्य राजश्री कुलकर्णी – M.D.( आयुर्वेद)