प्रसूती किंवा बाळंतपण ही स्त्रीच्या शरीरासाठी अतिशय कष्टदायक प्रक्रिया असते. आधी नऊ महिने बाळाची वाढ होण्यासाठी ती स्वतःच्या शरीरातून सगळे पोषक अंश रक्ताद्वारे बाळाला पुरवते आणि मग खूप वेदना, कळा सोसून बाळाला जन्म देते. त्यावेळी पुष्कळ प्रमाणात रक्तस्राव होतो जो पुढेही काही दिवस सुरुच असतो. शिवाय या सगळ्याच नऊ महिन्यांच्या काळात व प्रत्यक्ष प्रसूतीच्या प्रक्रियेत शरीरात वात दोष खूप वाढलेला असतो. थकवाही मोठ्या प्रमाणात असतो शिवाय लगेचच बाळाच्या पोषणाचीही जबाबदारी तिच्यावरच असते. प्रसूतीनंतर काही तासांतच स्तनपान देऊन ही जबाबदारी सुरु होते, त्यामुळे प्रसूतीनंतर पहिले तीन महिने, सहा महिने आणि बाळाचं स्तनपान बंद होईपर्यंत पुढे साधारण वर्षभर मातेचा आहार हा पौष्टिक हवाच आणि त्याची काळजी व्यवस्थित घेणं ही घरच्या सर्वांची जबाबदारी आहे.
सुरवातीच्या काळात दुधाचा स्त्राव चांगल्या व पुरेशा प्रमाणात सुरु होणं ही सर्वात महत्वाची व आवश्यक बाब आहे. त्यासाठी आईने द्रव व पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींमधील शास्त्र आपल्याकडे फार पूर्वीपासून माहीत असल्याने बाळंतिणीला वेगळा आणि ताजा, गरम आहार देण्याची पद्धत आहेच! सुरवातीला तीन दिवस काळा बोळ, हळदीची गोळी अशी औषधे गर्भाशयाची शुद्धी होण्यासाठी देतात. अंगावर दूध चांगले यावे म्हणून वेगवेगळ्या खिरी दिल्या जातात. खारकेची खीर, खसखशीची खीर, गव्हाची खीर अशा खिरी सकाळी नाश्त्यासाठी दिल्या जातात.
काही दिवसांनी खारीक खोबऱ्याचे लाडू, डिंकाचे, मेथीचे, अळीवाचे लाडू असे आलटून पालटून दिले जातात. या सगळ्या लाडूंमध्ये सगळ्या प्रकारचा सुका मेवा घातला जातो त्यामुळे ते पौष्टिक होतात तसेच शरीरातील वाढलेला वात दोष कमी करतात. डिंक खाल्ल्यामुळे हाडांची झीज भरून येते. हाडे बळकट होतात व प्रसूतीनंतर होणारे केस गळती सारखे त्रास होत नाहीत. गूळ घालून हे सगळे लाडू बनवले जातात त्यामुळे वात कमी होतो, शरीरातील रक्त वाढते.
काही ठिकाणी सुरुवातीला काही दिवस गव्हाची पोळी न देता ज्वारी किंवा बाजरीची भाकरी दिली जाते व त्यासोबत पातळ मेथीची भाजी, वरणाचे पाणी घालून तूप घालून कुस्करून खायला दिलं जातं. पचनावर ताण पडू नये म्हणून ही सगळी व्यवस्था केली जाते. रक्तस्राव झाल्यामुळे शरीरातील अग्नी मंद झालेला असतो त्यामुळे आधी द्रव व साधा आहार आणि नंतर हळूहळू पौष्टिक आहार अशा क्रमाने तो वाढवला जातो.
एकूणच आहारात स्निग्ध पदार्थांचं महत्त्व आहेच. वेगवेगळ्या प्रकारचा सुका मेवा खाऊ घालण्यामागे हेच कारण आहे. याशिवाय तूप खाण्याचं वेगळं महत्त्व आहे. गायीचं तूप खाण्याच्या प्रत्येक पदार्थात खाण्याची पद्धत आहे.
बऱ्याच स्त्रिया बाळांना दूध पाजतात परंतु स्वतः दूध पिण्याचा मात्र कंटाळा करतात. बाळाला जास्तीत जास्त काळ अंगावरचे दूध मिळावे अशी इच्छा असेल तर दीर्घकाळ स्वतः दूध पिणं अतिशय आवश्यक आहे. उलट दूध योग्य प्रमाणात येत रहावं यासाठी शतावरी कल्प सारखी जी औषधे डॉक्टरांकडून सुचवली जातात ती देखील घ्यायला हवीत.
पुरेशी झोप, विश्रांती आणि योग्य पोषक आहार असं सगळं व्यवस्थित सुरु ठेवलं तर प्रसूतीनंतर येणारा थकवा लवकरच दूर होतो. फक्त काही घरांमधून पौष्टिक आहार, झोप यांचा खूपच अतिरेक केला जातो आणि मग त्या स्त्रीचं वजन बेसुमार वाढतं, शरीरात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या पोकळ्यांमध्ये खूप चरबी साठू लागते आणि मग हे वाढलेलं वजन कमी करणे जिकिरीचे होऊन बसते. त्यामुळे पहिला महिना,सव्वा महिना विश्रांती झाली की घरातील किरकोळ कामे करण्यास सुरुवात करावी. योगासने, प्राणायाम, छोटे, साधे सोपे व्यायाम पुन्हा करायला सुरुवात करावी म्हणजे वजन व बांधा दोन्ही आटोक्यात राहतात.