जेवण

शरीराला एनर्जी मिळवून देण्यासाठी आहार हा एक महत्वाचा सोर्स आहे. दिवसातून साधारणपणे तीन ते चार वेळा खाल्ले जाते. त्यापैकी सकाळचा नाष्टा आणि संध्याकाळचे खाणे हे काही घरांमधून आढळत नाही परंतु दुपारचे व रात्रीचे जेवण पण हे मात्र जगभरात प्रत्येक घरात केले जाते.

जेवणात काय पदार्थ खावेत किंवा किती प्रमाणात खावेत या बाबतीमध्ये वैविध्य आढळून शकते परंतु जेवणाच्या वेळा या मात्र जितक्या व्यवस्थित पाळल्या जातील तितके स्वास्थ्य टिकवण्यासाठी उपकारक ठरते. कामाच्या वेळा तसेच स्वरूप यावरून बहुतेक ठिकाणी जेवणाच्या वेळा ठरवल्या जातात. काही ठिकाणी जसे की, वेगवेगळी ऑफिसेस, बँका इत्यादी ठिकाणी जेवणासाठी ठराविक वेळ लंच टाईम म्हणून नेमून दिलेली असते. अशावेळी त्या ठिकाणी काम करणारी माणसे त्याच वेळेस नियमितपणे जेवण्याची शक्यता अधिक असते. परंतु काही ठिकाणी मात्र अशा ठराविक वेळा नेमलेल्या नसतात तसेच घरांमधूननही गृहिणी बरेचदा जेवणाच्या वेळेला फारसे महत्त्व देत नाहीत. वास्तविक पाहता हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण आपल्या शरीराचे सर्व काम हे सूर्याशी निगडित असते व सूर्यप्रकाशाशी संबंधित असते. सकाळी उठल्यानंतर ठराविक वेळेला जठरामध्ये पाचक स्त्राव स्त्रवतात व भुकेची जाणीव होते. त्यावेळेला लगेचच जेवले गेले तर खाल्लेल्या अन्नाचे पचन उत्तम होते त्यापासून शरीराला मिळणारा सारभाग उत्तम प्रकारे शरीरात शोषला जातो. ऍसिडिटी, मलावष्टंभ, गॅसेस, करपट ढेकर येणे, डोकेदुखी अशा कोणत्याही स्वरूपाचे त्रास वेळेवर जेवण करणाऱ्या व्यक्तींना सहसा आढळत नाहीत.

याउलट जर जेवणाच्या वेळा नियमित नसतील तर बरेचदा अशी परिस्थिती असते की जठरामध्ये पाचक स्त्राव स्रवलेले असतात परंतु काही कारणाने त्यावेळी जेवण केले जात नाही. अशी परिस्थिती वारंवार उद्भवली तर त्या अम्लधर्मी स्रावांमुळे जठराची त्वचा जळल्या प्रमाणे होते आणि मोठ्या प्रमाणात ॲसिडिटीचा त्रास जाणवू शकतो. त्याकडेही दुर्लक्ष झाल्यास पुढे हा त्रास अल्सर्स मध्ये परिवर्तित होऊ शकतो. तसेच ज्यावेळी जेवण घेतले जाईल त्यावेळी त्याच्या पचनासाठी पाचक स्त्राव उपलब्ध नसल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होऊ शकत नाही. अन्न घशाशी येणे, छातीत जळजळ होणे, गॅसेस तयार होणे, मलावष्टंभ, पोट दुखी असे अनेक प्रकारचे त्रास यातून उद्भवू शकतात.

जेवणाच्या वेळांविषयी सांगायचं झाल्यास दुपारचे जेवण हे साधारणपणे 12 ते 1 च्या दरम्यान व्हायला हवे. हीच गोष्ट रात्रीच्या जेवणाला ही लागू होते कारण रात्रीचे जेवण हे फार उशीरा झाल्यास चांगल्या पद्धतीने पचत नाही. त्यामुळे रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी अडीच ते तीन तासाचे अंतर राहिल्यास पचन प्रक्रिया पूर्ण होते व नंतर झोपल्यास वरील कोणतेही त्रास जाणवत नाहीत. कच्चे पदार्थ जसे की सॅलड्स,कोशिंबिरी किंवा तळलेले पदार्थ, गोडाचे पदार्थ हे सर्व पचायला जड असतात. दिवसा आपल्या शरीराची काही ना काही स्वरूपाची हालचाल सुरू असते त्यामुळे घेतलेला आहार शरीर पचवू शकते परंतु अशा स्वरूपाचा जड आहार जर रात्रीच्या जेवणात घेतला तर मात्र त्याचे पचन व्यवस्थित होऊ शकत नाही म्हणून रात्रीचा आहार लवकर घेण्याबरोबरच तो पचायला हलका असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

शरीराच्या पोषण विषयक गरजा भागवण्यासाठी दुपारच्या जेवणात वरण-भात, भाजी पोळी, लिंबाची फोड, एखादी चटणी व कोशिंबीर एवढा आहार पुरेसा आहे. बदल म्हणून ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, पालेभाजी, ओली/ सुकी चटणी, आठवड्यातून एक दोन वेळा उसळ, कडधान्य यांचा वापर केल्यास चांगले पोषण मिळते. क्वचित कधीतरी गोड पक्वान्न अथवा मिठाई खाण्यास हरकत नाही. रात्रीचे जेवण मात्र साधेच ठेवावे. थोडासा भात/खिचडी, थोडी पोळी-भाजी यासोबत आमटी, कढी, सूप या सारखा आहार घ्यावा जेणेकरून त्याचे पचन लवकर होईल. अशा पद्धतीने आहार आणि त्याच्या वेळा यांचा समतोल साधल्यास स्वास्थ रक्षण करण्यास खूपच मदतीचे ठरते.

वैद्य राजश्री कुलकर्णी – M.D.( आयुर्वेद)