भारतीय संस्कृतीत आपले सणवार,कुळाचार यांची योजना बदलत्या ऋतूनुसार केली गेली आहे. त्या त्या वेळी केले जाणारे पदार्थ देखील त्या त्या हवामानाला अनुसरून आपल्या स्वास्थ्यासाठी हितकर असेच सांगितले गेले आहेत आणि त्या परंपरा आपण नेहमीच पाळत आलो आहोत. मराठी कॅलेंडरमध्ये तर प्रत्येक महिन्याची पौर्णिमा काहींना काही विशेष किंवा सण म्हणून पाळली जाते व प्रत्येक पौर्णिमेचं स्वतःचं असं काही तरी वैशिष्ट्य आहे. चैत्र महिन्यात येणाऱ्या हनुमान जयंती पासून ते शेवटच्या फाल्गुन महिन्यात येणाऱ्या होळी पौर्णिमेपर्यंत हे सुरु असतं.
अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा आपण कोजागिरी किंवा अश्विनी पौर्णिमा म्हणून ओळखतो. या दिवशी रात्रीच्या वेळी शुभ्र चांदण्यात मोठ्ठा उगवलेला गोल गरगरीत चंद्र बघत गार मसाला दूध पिण्याची पद्धत आहे. ही देखील केवळ रुढी म्हणून नव्हे तर शास्त्रीय दृष्ट्या महत्वाची गोष्ट आहे. अश्विन महिना म्हणजे ऋतू चक्रानुसार शरद ऋतू ! वर्षा ऋतू संपला , भाद्रपद महिना संपला की पाऊस कमी होत होत पूर्ण थांबतो आणि मग अचानक खूप कडक ऊन पडायला सुरुवात होते.सामान्य भाषेत हल्ली याला ऑक्टोबर हिट म्हणून ओळखले जाते.
पावसाळ्यातील कुंद, दमट हवामान, गारवा,नवीन पाणी आणि त्या काळात घेतला जाणारा आहार यामुळे हळूहळू शरीरात पित्त दोष वाढू व साठू लागतो.हाच साठलेला पित्त दोष शरदात कडक ऊन पडू लागले की उफाळतो आणि पित्ताचे विविध विकार निर्माण करतो.डोकेदुखी ,मळमळ, छातीत जळजळ होणे,पोटात आग होणे, आंबट कडू उलट्या होणे,हाता पायांची ,डोळ्यांची आग होणे, लघवीला आग होणे, नाकातून रक्तस्राव होणं अशा विविध तक्रारी अचानक डोकं वर काढतात.
हा त्रास होऊ नये म्हणून महत्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे आहारात ,विहारात बदल करणे! पावसाळ्यात केला जाणारा आलं,लसूण,गवती चहा,मिरे,दालचिनी यासारख्या उष्ण पदार्थांचा वापर कमी करायला हवा. याउलट पित्त शामक पदार्थ आहारात वाढवायला हवे. गोड, मधुर चवीचे व शीतल ,थंड पदार्थ पित्त कमी करतात व त्याला नियंत्रणात ठेवायला मदत करतात. फक्त थंड पदार्थ जे वापरायचे ते नैसर्गिकरित्या थंड हवेत,कृत्रिम पद्धतीने गार केलेली शीतपेये ,आईस्क्रीम वगैरे नकोत!
आयुर्वेदानुसार सर्वात उत्तम पित्त शामक आहारीय पदार्थ म्हणजे तूप आणि दूध ! रोजच्या जेवणात तुपाचा वापर आपण करतोच ,तो करायलाच हवा पण दूध मात्र काहीजण खूप आवडीने पितात तर काही जण दुधाचा नुसता वास आला तरी नाक मुरडतात! अशावेळी पित्त नियंत्रित राहावं म्हणून चव किंवा वास यापेक्षा दुधाच्या गुणांकडे लक्ष देऊन दूध अवश्य प्यायला हवं.
अश्विन महिन्यात पाऊस पूर्ण थांबल्यामुळे आकाश निरभ्र असतं, पौर्णिमेला पूर्ण चंद्र आणि टिपूर चांदणं असतं ,हे चंद्रकिरण किंवा चंद्राचा प्रकाश अतिशय शीतल असतो .त्यामुळे हा थंडावा मिळण्याच्या हेतूनेच यादिवशी दूध पिण्याची पद्धत आहे. हा गारवा दुधात हळूहळू झिरपावा, मुरावा म्हणून या दिवशी सकाळी दूध आटवून ठेवावं व संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर मोकळ्या अंगणात, गच्चीवर किंवा गॅलरीत दूध थंड व्हायला ठेवावं.दुधाच्या भांड्यावर पातळ कॉटन किंवा मलमलचं कापड झाकून ठेवावं म्हणजे धूळ वगैरे पडत नाही.
रात्री मित्रमंडळी ,सगेसोयरे मिळून गप्पा मारत, गाणी म्हणत या दुधाचा सावकाश आस्वाद घ्यावा असा जणू अलिखित संकेतच आहे. फक्त आपल्याकडे याच्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी जोडल्या गेल्या आहेत त्या मात्र टाळायला हव्या.जसं की, या दुधासोबत भेळ ,पाणीपुरी,पावभाजी ,सँडविच, दाबेली असे पदार्थ बनवून ते आधी खाल्ले जातात आणि मग त्यावर हे दूध प्यायलं जातं. वरील सगळ्या पदार्थांत एक तर आंबट चिंचेचं पाणी वापरलं जातं किंवा पाव वापरले असतील तर ते स्वतःच आंबवून ,फरमेन्ट करुन तयार केले जातात .दाबेली, पावभाजी, पाणीपुरी ,भेळ सगळ्याच पदार्थात काहींना काही मसाला घालावा लागतो जो चमचमीत असतोच .चवीला जरी हे सगळे पदार्थ छान लागत असले तरी ते दुधासोबत खाणं चुकीचं आहे .त्यामुळे दूध पोटात जाऊन नासल्या प्रमाणे होते आणि हे सगळं कॉम्बिनेशन पित्त कमी करण्याऐवजी वाढवते व दुसऱ्या दिवशी अनेकांना खूप त्रास होतो.
हे दूध तयार करताना खरं म्हणजे नुसती खडीसाखर आणि वेलचीपूड घालणं अपेक्षित आहे परंतु आपल्याकडे मात्र दूध अगदी घट्ट रबडी प्रमाणे आटवून ,मलईदार बनवून शिवाय त्यात भरपूर सुका मेवा ऍड केला जातो. आटीव दूध आधीच पचायला जड होतं त्यात ड्रायफ्रूटस घातल्याने ते अजूनच जड होतं. गप्पा मारत काही खाल्लं की नकळत जरा जास्त खाल्लं जातं, त्यावर दूध हे पचनावर फारच ताण देणारं ठरतं. त्यात जागरण ,झोप कमी मिळणं अशा गोष्टी झाल्या की अनेकांचा दुसरा दिवस फारच खराब होतो. काही जणांना पित्ताच्या उलट्या,डोकेदुखी, मळमळ,भूक न लागणे ,इतकंच नव्हे तर जुलाब होणं असेही त्रास होतात .आदल्या दिवशी केलेली सगळी मजा हवेत विरुन जाते.
त्रास कसा टाळालं ?
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री वर वर्णन केलेले पदार्थ दुधासोबत खाणं टाळा.
सगळे मिळून फक्त दुधाचा आस्वाद घेण्यासाठी जमा ,बरोबर खायला काहीच नको ,उलटपक्षी संध्याकाळी लवकर काहीतरी हलका आहार घ्या,जेणेकरून भूक राहील,दूध पचेल व पचनावर ताण येणार नाही.
दूध खूप घट्ट आटवू नका तसेच खूप ड्रायफ्रूटसचा त्यात भडिमार करु नका ,चव छान येईल इतपत घालायला हरकत नाही.
ज्यांचा कोठा मुळातच हलका आहे अशा व्यक्तींनी दूध बेतानेच प्यावे तसेच पुरेशी झोप होईल याची दक्षता घ्यावी.
गार दूध मस्त लागतं म्हणून फ्रिजमध्ये ठेवून गार करु नये, ते नैसर्गिकरित्या थंड झालं तरच गुणकारी होईल.
दुधाचा मसाला
एक लिटर साधारण घट्ट आटलेल्या दुधासाठी
पाच काजू
चार बदाम
चार पिस्ते
तीन वेलचीचे दाणे
थोडं किसलेलं जायफळ
दहा बारा केशर काड्या
हे सगळं एकत्र करून,पूड करुन थोड्या दुधात आधी थोडा वेळ भिजत ठेवावी व नंतर सगळ्या दुधात सावकाश हलवून मिसळावी म्हणजे स्वाद, सुवास व रंग उत्तम येतो. साधी साखर वापरण्यापेक्षा खडीसाखर आपल्या आवडीनुसार वापरावी ,दूध आटवले की मुळातच गोड लागते त्यामुळे साखर जरा कमीच वापरावी.
चांदी ही आयुर्वेदानुसार शीत म्हणजे थंड गुणांची सांगितली आहे त्यामुळे आटीव दूध चांदीच्या भांड्यात पिण्याची पद्धत आहे जी योग्यच आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य चांदीच्या पेल्यात हे दूध प्यावे. खरं म्हणजे शरद ऋतूत पित्त नियंत्रणात रहावं म्हणून रोज दूध पिणं फायदेशीरच आहे पण रोज असं आटीव दूध पिणं पचनाच्या दृष्टीने योग्य नाही म्हणून संध्याकाळचं जेवण लवकर करुन नुसतं दूध किंवा दुधात तूप घालून पिण्यास हरकत नाही.हेमंत ऋतू सुरु झाला म्हणजे चांगली थंडी पडायला सुरुवात झाली की मात्र गार दूध पिऊ नये तसेच रात्रीही पिऊ नये तर सकाळी उपाशीपोटी आणि गरम दूध प्यायला सुरुवात करावी.
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा !सगळे नियम पाळून आपण कोजागिरी साजरी केली तर ती नक्कीच “शारद सुंदर चंदेरी रात” होईल यात शंका नाही !
वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)