प्रत्येक सिझनच्या हवामानातील बदलामुळे तब्येतीवर होणारे परिणाम हे भिन्न भिन्न असतात. हवेत गारवा आला,ओलावा आला,कोरडेपणा वाढला तर त्वचेवर देखील त्याचा परिणाम होतो व तो सिझन बदलला की थोड्या दिवसांत जाणवू लागतो.
थंडीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास हेमंत आणि शिशिर हे दोन ऋतू म्हणजे चार महिने थंडी असते. नोव्हेंबरमध्ये सुरु झालेली थंडी सुरुवातीला थोडी कमी असते आणि मग वाढत जाते. जानेवारी महिन्यात ती सर्वात जास्त जाणवते व बोचरी असते कारण हवा कोरडी तर असतेच पण त्यासोबत गार वारा सुटतो त्यामुळे ती जास्तच जाणवते . विशेषतः सकाळी पहाटे व रात्री तिची तीव्रता अधिक जाणवते.
आपल्या त्वचेखाली विशिष्ट प्रकारच्या ग्रंथी एक प्रकारचा तैलीय स्त्राव त्वचेवर सोडत असतात जेणेकरून त्वचा मृदु व लवचिक राहते .उन्हाळ्यात हवा कोरडी असली तरी हवेत उष्मा असल्याने भरपूर घाम येतो व त्वचा ओलसर राखली जाते.परंतु हिवाळ्यात मात्र हवा खूप कोरडी होते ,त्वचेतील तैलीय स्त्राव कमी होतात आणि त्वचा रुक्ष, रखरखीत होऊ लागते. अशा वेळी त्वचेची काळजी जर व्यवस्थित घेतली गेली नाही तर कोरडेपणा खूप वाढल्यामुळे त्वचेला खाज येऊ लागते आणि खाजवल्यावर त्वचा पांढरट होते,त्यावर रेषा उठतात .जर नखं थोडी वाढली असतील तर क्वचित त्वचेतून रक्त पण येतं इतका कोरडेपणा वाढतो .
विशेषतः ओठ फुटणं, गाल उलणं, टाचा फाटणं,हाता पायांना भेगा पडणं, डोक्याची त्वचा म्हणजे स्काल्प रुक्ष होऊन केसांत कोंडा होणं ,खाज येणं या हिवाळ्यात जाणवणाऱ्या प्रमुख तक्रारी आहेत.कोरडेपणा वाढला की विरुद्ध उपचार करायला हवा हे तर सरळ आहे.पण तो केवळ बाह्योपचार करुन भागत नाही तर आतून बाहेरून पुरवावा लागतो.
खरं तर दिवाळीच्या आसपास जेव्हा थंडी पडायला सुरुवात होते तेव्हा त्यासाठीच अभ्यंग स्नानाची योजना आहे जे की पुढे पूर्ण चार महिने म्हणजे थंडी संपेपर्यंत करणं अपेक्षित आहे परंतु ते चार दिवसांत बंद केलं जातं त्यामुळे शरीरात रुक्षता वाढते. रोज अगदी सुवासिक अभ्यंग तेलच वापरायला हवं असं नाही. साधं तिळाचं किंवा खोबऱ्याचं तेल देखील चालतं. जास्त थंडी असताना उष्ण गुणांचं मोहरीचं तेलही चालेल. तेल कोमट करुन अंगाला लावावे,खूप जोर लावून, रगडायची गरज नाही. त्वचेवर असणाऱ्या सूक्ष्म रंध्रांमधून हे तेल आत शोषलं जाणं गरजेचं आहे. तेल चोळल्यावर ते थोडा वेळ मुरु द्यायला हवं,लगेच अंघोळ करुन धुवून टाकू नये.त्यासाठी तेल रात्री झोपताना लावावं किंवा सकाळी वेळ असेल तर अंघोळीपूर्वी किमान दोन तास लावावं.
बरेच जणांना तेल लावणं हे फार कटकटीचं वाटतं, अंग ,कपडे चिकट ,तेलकट होतात असं वाटतं त्यामुळे ते बरेचदा बाजारात उपलब्ध असणारी क्रीम्स वापरतात, ते सोपं वाटतं. पण त्यांचा उपयोग देखील तेवढाच मर्यादित असतो.त्यात केवळ त्वचा सॉफ्ट वाटेल अशी केमिकल्स वापरली जातात, त्यामुळे दिवसा बाहेर जाण्यापुरते असं एखादं क्रीम वापरायला हरकत नाही पण त्वचेची खरी निगा राखायची असेल तर रात्री तेल लावणं पण तितकंच आवश्यक आहे.
टाचा फुटत असतील तर रात्री पाय स्वच्छ धुवून थोडा वेळ गरम पाण्यात बुडवून ठेवावेत व नंतर कोरडे करुन त्यावर कोकम तेल चोळावे किंवा अगदी घरगुती उपाय म्हणून लोण्यात हळद मिक्स करून ते चोळावे,टाचांच्या भेगा पट्कन भरुन येतात.
थंडीच्या दिवसांत आहारातही स्निग्ध पदार्थ ठेवणं आवश्यक आहे कारण ते ऊर्जाही पुरवतात व कोरडेपणा दूर करण्यासाठी मदत करतात.अगदी साध्या शेंगदाणे, तीळ,खोबरं यापासून ते सुक्या मेव्यातील काजू,बदाम,अक्रोड ,पिस्ते,खजूर,अंजीर ,जर्दाळू इथपर्यंत काहीही आपल्या आवडीनुसार वापरता येतात. हे पदार्थ वेगवेगळे खाण्यापेक्षा एकत्र करून त्यात डिंक,मेथ्या घालून जे थंडीचे लाडू बनवायची पद्धत आहे त्यानुसार लहान लहान लाडू बांधून सकाळी उपाशीपोटी एक लाडू रोज खावा.
रोजच्या जेवणात किमान दोन चमचे तूप ,अधूनमधून लोणी ,साय यांचाही समावेश करावा.तिळाचे लाडू, खोबऱ्याच्या वड्या ,तीळ गुळाच्या पोळ्या तूप लावून खायला हव्यात. वजन ,डाएट यांचा विचार करायलाच हवा पण सिझनमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी तारतम्य बाळगून करायलाच हव्यात.
ओठांना तूप,लोणी लावत राहावे म्हणजे ओठ फुटत नाहीत.सकाळच्या सगळ्या कामांना गरम पाणी वापरावे म्हणजे थंडीपासून बचाव होतो.
अशा पद्धतीने आहार विहार यात बदल केल्यास थंडीत त्वचेची निगा चांगल्या पद्धतीने राखता येते.
वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)