सध्याच्या काळात या नावापेक्षा ऍसिडिटी या नावाने फेमस असणारा, म्हटलं तर साधा पण कधी कधी खूपच त्रास देणारा असा हा आजार ! मजा तर खरी याच्या नावपासूनच सुरु होते. लोकं कोणकोणत्या लक्षणांना ऍसिडिटी म्हणून सांगतील, वर्णन करतील याचा काहीच भरोसा नाही. इतकंच नव्हे तर आमच्या पंचवीस वर्षांच्या प्रॅक्टीसमधला अनुभव उलट असाच आहे की बहुतांश वेळा पेशंट्स गॅस होतात, पोट फुगतं, गुबारा धरतो, गॅसेस पास होतात, त्याचा आवाज आणि घाण वास येतो, खूप ढेकर येतात या भाषेत त्यांचा त्रास सांगायला लाजतात आणि यापैकी एक किंवा अनेक लक्षणे असतील तर सरळ ऍसिडिटीचा त्रास आहे, असं सांगून मोकळे होतात. मग जेव्हा आम्ही डिटेल हिस्ट्री घेतो, लक्षणं विचारतो तेव्हा ते स्पष्ट होतं. नव्वद टक्के लोकांना हा फरक माहीतही नसतो आणि त्यामुळे सांगताही येत नाही.
मग अम्लपित्त नक्की कशाला म्हणायचं ? तर याची विविध लक्षणे असतात. ती एकत्र किंवा वेगवेगळी रुग्णामध्ये सापडतात.
हा त्रास कशामुळे होतो?
आपण रोज जो आहार घेतो त्यापासून आपल्या शरीर घटकांचं पोषण होत असते. आपल्या रोजच्या कामांसाठी लागणारी ऊर्जा आपल्याला मिळत असते. पण नुसतं अन्न खाऊन उपयोग नसतो, जे अन्न खाऊ त्याचं उत्तम प्रकारे पचन व्हायला हवं आणि ते प्रामुख्याने पित्ताद्वारे होत असते. हा पित्ताचा स्त्राव नियंत्रित प्रमाणात हवा तेवढा झाला तर पचन व्यवस्थित होतं. पण आहारात काही चुका झाल्या, पित्त वर्धक आहार वारंवार खाण्यात आला, जेवणाच्या वेळा नियमित नसल्या तरी पचन बिघडते. कधी कधी जेवायला खूप उशीर होतो तेव्हा त्याचं पचन होण्यासाठी पित्त उपलब्ध नसतं.
रोज साधारण दुपारी बारा वाजता जेवायची सवय असेल तर त्यावेळी जठरात बरोबर पित्ताचा स्त्राव होतो कारण ही प्रक्रिया निसर्ग नियमितपणे करतो पण जर त्या दरम्यान जेवले नाही तर हे आंबट चवीचे आणि तीक्ष्ण असे स्त्राव जठरात बराच काळ तसेच राहतात कारण पचनाची प्रक्रिया सुरू व्हायला अन्नच नसते. मग छातीत जळजळ होणे, तोंड आंबट पडणे, आंबट पाणी घशाशी येणं अशा तक्रारी जाणवतात. काही कारणाने हे असेच सुरु राहिले तर जठराच्या नाजूक अंतः त्वचेला छाले पडतात, अल्सर निर्माण होतात आणि क्वचित त्यातून रक्तस्राव होऊन गंभीर परिस्थिती देखील उद्भवू शकते.
काही जणांची मूळ प्रकृती पित्ताची असते, त्यांनी वारंवार पित्त वर्धक आहार घेतला तर पित्त अधिकच वाढते आणि त्याची लक्षणे दिसू लागतात. तुरीची डाळ, मेथी, कारलं, काकडी या भाज्या, शेंगदाणे, इडली, डोसा, ढोकळा, ब्रेड इ. आंबवलेले पदार्थ यामुळे पित्त वाढते. जागरण, उन्हात फिरणं, प्रवास यामुळेही काही जणांना डोकेदुखी, उलट्या अशा तक्रारी उद्भवतात.
यासाठी काय करता येईल?
बघूया पुढील भागात!
–वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)