डोकेदुखी

तब्येतीच्या ज्या विविध प्रकारच्या तक्रारी असतात त्यातील अतिशय कॉमन तक्रार म्हणजे डोकेदुखी! प्रत्येकाला कधीनकधी याचा सामना करावाच लागतो. काही जणांना तर नेहमीच वारंवार होणारा त्रास असतो ही डोकेदुखी!

डोकेदुखीची तीव्रता आणि एरिया हा देखील वेगवेगळा असतो. डोकं थोडं जड झालंय, बधीर झालंय, डोकं चांगलंच दुखतंय, इथपासून तर डोक्यात घणाचे घाव घातल्यासारखं दुखतंय, डोकं आता फुटेल असं वाटतंय इथपर्यंत तीव्रता असते. कधी कधी पेशंट्स खरोखरच भिंतीवर डोकं आपटून घेतात, रडतात इतकी ही डोकेदुखी असह्य होते.

काहीवेळा फक्त कपाळ दुखतं, कधी फक्त कान आणि डोळा याच्या मधल्या जागेत म्हणजे ज्याला आम्ही शंख प्रदेश म्हणतो तिथं दुखतं. कधी डोकं आणि त्या बरोबर डोळेही दुखतात. कधी फक्त डोक्याचा मागचा भाग दुखतो, कधी संपूर्ण डोक्यासहित मान पण दुखते तर कधी अर्धं डोकंच दुखतं, कधी फक्त खाली वाकलं किंवा नुसतं बघितलं तरी डोक्यातून चमका निघतात. कधी डोकं दुखलं की त्यासोबतच मळमळ, उलटीची संवेदना होते, कधी डोकं चढलं की भयंकर चिडचिड होते, माणसं नको, आवाज नको, उजेड नको असं वाटतं! अबब, किती हे प्रकार !

ज्या अर्थी इतके प्रकार आहेत त्या अर्थी कारणं पण वेगवेगळी असणार हे उघडच आहे. डोकेदुखीचा प्रामुख्याने विचार करताना कशामुळे आहे हे बघणं गरजेचं आहे. पित्त आणि वात या दोन्ही दोषांमुळे डोकेदुखी उद्भवू शकते किंवा दोन्ही एकत्र बिघडले तरी डोकं दुखतं.

जागरण, उन्हात जाणं, खूप वेळ उपाशी राहणं, वेळेवर जेवण न करणं, जेवणात खूप तेलकट, मसालेदार पदार्थ खाणं यासारखी कारणं घडली तर होणारी डोकेदुखी ही पित्त दोषाशी संबंधित असते. या लोकांची प्रकृतीही प्रामुख्याने पित्त प्रधान असते. बरेचदा यांना कारणं पाठ असतात, अमुक गोष्ट घडली तर आता आपलं डोकं नक्की दुखणार हे देखील माहीत असतं पण बरेचदा नाईलाज किंवा अमुक गोष्ट खाण्याचा मोह आवरता न आल्याने यांना डोकेदुखीचा सामना करावा लागतो. उदा. मेथी, कारलं, तूरडाळ, शेंगदाणे, ब्रेड, आंबवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, शिळे अन्न यापैकी काही खाल्लं तर त्रास होतो असा यांचा पुष्कळदा अनुभव असतो पण नेमके यातलेच काही पदार्थ आवडीचे असतात आणि त्यांचा मोह टाळता न आल्याने दुसऱ्या दिवशी डोकेदुखी ठरलेली असते. असह्य डोकं दुखतं, चिडचिड होते, मळमळ होते आणि जोपर्यंत हे वाढलेलं आंबट, कडू चवीचं पित्त पडून जात नाही तोपर्यंत चैन पडत नाही आणि डोकंही उतरत नाही. एकदा उलटी होऊन गेली की हे पुन्हा फ्रेश होतात!

दुसरा प्रकार आहे तो प्रामुख्याने गतीशी, वाऱ्याशी संबंधित आहे. प्रवास झाला, कानाला, डोक्याला वारा लागला, फॅनखाली झोपलं, खिडकीतून येणारा वारा डायरेक्ट अंगावर लागला, भरपूर उलटसुलट प्रवास केला, झोप अपुरी झाली की शरीरातील वात दोष प्रमाणाबाहेर वाढतो आणि डोकं दुखू लागतं. या प्रकारच्या डोकेदुखी मध्ये जनरली उष्ण उपायांनी बरं वाटतं म्हणजे आलं घालून गरमागरम चहा घेतला, डोक्याला गरम तेलाने मालिश केलं आणि डोकं गरम कपड्याने गच्च बांधून ठेवलं, विश्रांती घेतली की बरं वाटतं.

अर्धशिशी वाटावी असं जे डोकं दुखतं ते मात्र खूपच गंभीर असतं. बहुतेक वेळा सकाळी उठल्यावर हळूहळू डोकं दुखायला सुरुवात होते. बाहेर उन्हाची तीव्रता वाढेल तसतसे डोकं दुखणं वाढत जाते आणि कधी कधी पेशंट्स डोकं अक्षरशः भिंतीवर आपटून घेतात इतकं हे दुखणं त्यांना अशक्य होतं. उजेड सहन होत नाही, डोकं जास्तच दुखतं त्यामुळे! आवाज नकोसे वाटतात. अंधाऱ्या खोलीत एकटं पडून राहावंसं वाटतं. कधी कधी ही डोकेदुखी तीन तीन दिवस सुरु राहते.

क्वचित काही रुग्णांना आपल्याला ब्लडप्रेशरचा त्रास आहे हेच माहीत नसतं, बरेच दिवस सारखं सारखं डोकं दुखतंय अशी तक्रार करत राहतात, मग अचानक तपासणीसाठी गेल्यावर हे लक्षात येतं ही डोकेदुखी पुष्कळ तीव्र असते.

डोळ्याचा नंबर असणं हे एक डोकेदुखीचं एक अगदी कॉमन कारण आहे. विशेषतः लहान मुलं जेव्हा डोकेदुखी असल्याची तक्रार करतात तेव्हा चष्मा लागलेला असतो.

बरेचदा डोकेदुखीची कारणं मानसिक असतात. खूप मानसिक ताण तणाव असणं, कामाचा स्ट्रेस, काही कारणांनी वारंवार रडणं, रात्री अपुरी झोप होणं, अति विचार करणं अशा कारणांमुळे डोकं दुखू शकतं. याशिवाय काही गंभीर आजारांमध्ये अचानक उद्भवणारी डोकेदुखी असते. मेंदूला सूज येणे, मेंदूला इन्फेक्शन होणे, ट्युमर किंवा गाठी होणे या कारणांनी तीव्र डोकेदुखी जाणवू शकते.

डोकेदुखी या एका लक्षणामागे इतकी अनेकविध कारणं असू शकतात त्यामुळे हा विषय दुर्लक्षित ठेवू नये. वेळेवर कारण जाणून ताबडतोब उपाय करुन या त्रासातून मुक्त होऊ शकतो.
यासाठी आजच संपर्क साधा.

वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)
आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल
स्वामी समर्थ केंद्राशेजारी, रथचक्र सोसायटी जवळ
इंदिरा नगर, नाशिक
संपर्क : 0253 2322100