धूपन क्रिया

साध्या शब्दात सांगायचे झाले तर धूप घालणं म्हणजे धूपन ! आपल्या कडे फार पूर्वी पासून ही क्रिया व तिचे फायदे, महत्व हे सगळं माहीत आहे पण आधुनिकतेच्या नावाखाली आपण ते सगळं सोडून दिलं आहे. म्हणजे बघा अमावस्येला उद वगैरे घालून किंवा धुपाची रेडिमेड कांडी संध्याकाळी घरात फिरवायची आपल्या कडे पद्धत होती. वातावरणात विशिष्ट वेळी होणाऱ्या बदलांमुळे हवेत वेगवेगळ्या जीव जंतूंचा प्रादुर्भाव होतो जो आपल्या स्वास्थ्यासाठी हानीकारक असतो आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम धूपनासारख्या प्रक्रियेने टाळता येतो हे पूर्वजांना माहीत होते म्हणून ही पद्धत नियमित करण्यासाठी रुढ झाली.

याच प्रकारे घरात स्त्रीची प्रसूती झाल्यानंतर तिला आणि बाळाला धुरी देण्याची पद्धत होती. ओवा, वेखंड, लसणाची साले, शेपा निखार्यावर टाकून त्याचा निघणारा धूर तो दोरीने विणलेल्या खाटेवर त्या स्त्रीला बसवून दिला जाई, प्रसूती झाल्यानंतर जेव्हा स्त्रीच्या गर्भाशयातून वार बाहेर पडते तेव्हा त्या जागी मोठी जखम तयार होते. त्या ठिकाणी जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते आणि मग त्यातून ताप येणं किंवा इतर कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते. ती टाळण्यासाठी ही धुरी उपयोगी पडते.

अशीच धुरी बाळाच्याही सर्व अंगाला दिली जाते. एका मोठ्या लोखंडी पाटीत कोळसे, शेणाच्या गोवऱ्या पेटवून त्यात धुरीची द्रव्ये टाकून त्यावर नुकतीच अंघोळ झालेल्या बाळाला फिरवलं जातं. त्याचे दोन फायदे होतात ,एक म्हणजे त्या उष्णतेने बाळाचे केस वगैरे छान कोरडे होतात त्यामुळे सर्दी होत नाही, दुसरं म्हणजे जंतुसंसर्ग होण्याचा धोका राहत नाही कारण बाळालाही बेंबीच्या ठिकाणी जखम असतेच ! ती चांगली कोरडी होऊन भरुन येणं गरजेचं असतं. या सगळ्या चांगल्या पद्धती आपण बंद केल्या पण आज पुन्हा त्यांचेच पुनरुज्जीवन करण्याची गरज कोरोना या विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झाली आहे.

वातावरण स्वच्छ, शुद्ध असलं की कोणताही संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. आता तर अशी परिस्थिती उदभवेल की कोरोना पूर्ण नाहीसा झालेला नाही आणि पावसाळा सुरू झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारे इतर व्याधी, फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अजून बळावेल. या सगळ्या पासून बचाव व्हावा म्हणून घरात किंवा कामाच्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी नियमित धूपन करणं गरजेचं आहे. स्वैपाकघर, झोपण्याची खोली, ओल येऊ शकते अशा जागा, जसं बाथरूम वगैरे सगळ्या ठिकाणी धूपन करावं.

ओवा, वेखंड, लसूण ही सगळी औषधं उग्र वासाची तसेच जंतुघ्न गुणधर्म असणारी आहेत. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका टाळता येईल, त्यामुळे सर्वांनी हा सोपा पण तितकाच प्रभावी उपाय घरात नक्की करायला हवा.

वैद्य राजश्री कुलकर्णी, M.D.( आयुर्वेद)