झोप – १

झोप हा तसं पाहिलं तर प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय! विशेषतः थंडीच्या दिवसांत उबदार दुलई पांघरून झोपायला कोणाला आवडत नाही? पण हल्ली ही झोप लागणं आणि पुरेशी मिळणं या गोष्टी दुरापास्त होत चालल्या आहेत.त्याची अनेक कारणं आहेत.

बदलती जीवनशैली हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. नोकरी करणं, त्यासाठी करावा लागणारा अटळ प्रवास यात खूप उशीर होतो. विशेषतः बायकांच्या दृष्टीने हे सगळं रुटीन खूपच त्रासदायक असतं कारण नोकरी करून घरी आल्यावर पुन्हा स्वैपाक, मुलांचा अभ्यास, परीक्षा यांचं शेड्यूल सांभाळणं, घरच्या ज्येष्ठ नागरिकांच्या तब्येती, दवाखाने सांभाळणं, दुसऱ्या दिवशीची तयारी यासाठी त्यांना वेळ द्यावाच लागतो मग त्यांची इच्छा असो वा नसो! हल्ली कोणत्याही सर्वसामान्य घरांत जेवणं होऊन, टिव्ही बघून झोपायची एव्हरेज वेळ रात्री अकराची झाली आहे. काही जास्तीचं काम असेल तर ही वेळ अजून पुढं ढकलली जाते कारण हातात नक्की असणारा असा हा रात्रीचाच वेळ असतो. सकाळी उठण्याची वेळ मात्र प्रत्येक गृहिणीची ठरलेली असते कारण नोकरी असो की मुलांची शाळा डबे, स्वैपाक या गोष्टी कराव्याच लागतात. अशावेळी झोप नेहमीच कॉमप्रमाईझ होते. दुपारी झोपायला मिळतंच असं नाही.

शाळा, कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांची कथाही काही वेगळी नाही कारण शाळा, अभ्यास, क्लासेस, सबमिशन्स हे सतत सुरुच असतं. जागरण हे बरेचदा अनिवार्य असतं.

काही जणांना शिफ्ट ड्यूटी करावी लागते. कधी कधी तीन शिफ्टस मध्ये एक एक आठवडा असं सतत काम करावं लागतं. एक आठवडा कसं बसं शरीर झोपेचं रुटीन सेट करायचा प्रयत्न करत असताना परत शिफ्ट बदलते आणि वेळीअवेळी झोप, अपुरी झोप असं दुष्टचक्र सुरुच राहतं. ही आत्तापर्यंत वर्णन केलेली बहुतांश कारणं ही न टाळता येण्यासारखी आहेत कारण ती त्या त्या व्यक्तीच्या नियमित रुटीनचा एक अविभाज्य भाग आहेत पण सध्या जो मोबाईल नावाचा विचित्र राक्षस आपल्या घराघरांत घुसलाय तो वेळ, नाती, झोप या सगळ्याच गोष्टींमध्ये बाधा आणतोय, अडथळे निर्माण करतोय!

सिनेमे, नाटकं ही मनोरंजनाची साधनं पूर्वीपासूनच अस्तित्वात होती पण जोपर्यंत त्यासाठी घराबाहेर जावं लागत असे तोवर त्यावर बरंच नियंत्रण होतं पण जेव्हा पासून हे सगळं मोबाईलवर घरातच उपलब्ध झालं तेव्हापासून वेळेचं काही नियंत्रण राहिलंच नाही. त्यात सोशल मीडिया आल्यापासून व्हाट्सएप,ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर सगळीच लहानथोर मंडळी इतकी बिझी झाली की रात्रीचे दोन तीन वाजून गेले तरी चॅटिंग संपत नाही, वेळेचं भान रहात नाही. सकाळी उठून पुन्हा आपापल्या कामाला लागावं लागतंच मग शेवटी परिणाम कशावर होतो तर तो पुन्हा झोपेवरच! शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी अन्न जितकं महत्वाचं आहे तितकीच झोपही आहे.कारण टिश्यूजची होणारी झीज झोपेत भरुन काढली जाते.यासाठी साधारण सहा ते आठ तासांची शांत झोप आवश्यक असते.

लहान बाळं आणि वृद्ध व्यक्ती यांना जास्त झोपेची आणि विश्रांतीची गरज असते कारण मुलांची जलद वाढ होत असते आणि वृद्ध लोकांच्या शरीरात झपाट्याने झीज होत असते. मध्यमवयीन व्यक्तींना मात्र सहा ते सात तासांची झोप पुरेशी असते.पण हल्ली ती तेव्हढीही मिळत नाही आणि त्यामुळे आरोग्य विषयक अनेक समस्या कमी वयातच डोकं वर काढत आहेत.

रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे साहजिकच सकाळी लवकर उठायची इच्छा होत नाही, ज्यांना सकाळी लवकर कुठं जायचं नसतं ते मग उशीरापर्यंत झोपून राहतात. मग पचनसंस्थेचे अनेक आजार उद्भवू शकतात. रात्री जागरण केल्याने वात दोष वाढतो, आतड्यांना कोरडेपणा येतो .त्यामुळे हळूहळू मलावष्टंभ होऊ लागतो जो पुढे खूपच त्रासदायक होऊ शकतो.वेळीअवेळी झोपल्याने ऍसिडिटी वाढते,डोकेदुखी, छातीत जळजळ होणे,उलट्या होणे हे त्रास होऊ शकतात.वेळेवर न उठल्याने खाण्यापिण्याची वेळ बदलते ज्याचा परिणाम अग्नी मंद होणे असा होतो.चांगली कडकडून भूक लागत नाही.खाल्लेलं नीट पचत नाही,गॅसेस,ढेकर येणे अशा तक्रारी जाणवत राहतात. असं सातत्याने सुरु राहिलं तर त्याचा परिणाम पोषणावर होतो आणि वजन कमी होणे, अशक्तपणा येणं ही लक्षणे दिसू लागतात.

झोप अपुरी झाली तरी सकाळी उठावंच लागतं अशी परिस्थिती असेल तर डोळे आणि डोकं दुखणं, कामात लक्ष न लागणं, दिवसभर झोप आणि जांभया येत राहणं, कामात चुका होणं , चिडचिड होणं हे त्रास जाणवतात. वजन झपाट्याने कमी होतं.

रात्री उशिरापर्यंत मोबाईल वर सिनेमा बघणं किंवा चॅट करणं, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं तेही बरेचदा पालकांच्या भीतीपोटी अंधारात किंवा पांघरुणाच्या आत मोबाईल धरुन केल्याने डोळे आणि मान यांच्या अनेक तक्रारी होतात. डोळ्यांवर अतिरेकी ताण आल्यानं डोळे दुखणं,चुरचुरणे, लाल होणे,डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं, चष्मा लागणं किंवा असलेला नंबर वाढणं असा हा पाढा न संपणारा आहे .

वेड्यावाकड्या पोश्चर मध्ये अवघडून बसणं किंवा झोपून मोबाईल ऑपरेट केल्यानं मान अवघडणे,खांदे दुखणं,सूज येणे ,पाठ,कंबर आखडणं इतकंच नव्हे तर पुढे कमी वयात स्पॉंडीलायटीस सारखे गंभीर परिणाम देखील होऊ शकतात.

शारीरिक परिणाम तर आहेतच पण मानसिक परिणाम अतिशय भयंकर व गंभीर आहेत.झोप सतत कमी झाल्याने चिडचिड होणं,इरिटेबल स्वभाव होणं हे परिणाम तर होतातच पण सतत त्या आभासी जगात राहून इतरही खूप परिणाम होतात. सतत व्हाट्सएप,इन्स्टाग्रामवर आपल्या पोस्ट्स कोणी पाहिल्या, किती लाईक्स आले,किती कॉमेंट्स आल्या हे चेक करत राहण्याचं जणू व्यसन लागतं. ते मनासारखं नसेल तर काही जणांना अक्षरशः नैराश्य येतं.कधी कधी मतं वेगवेगळी असली तर चक्क भांडणं होतात .आभासी जगात हजारो फ्रेंड्स असणाऱ्या कित्येक जणांना प्रत्यक्ष आयुष्यात एखादी अडचण आली तर मदत करायला एकही खरा मित्र नसतो ही किती विरोधाभास असणारी गोष्ट आहे.
थोडक्यात सांगायचे तर कमी झोप ही अनेक प्रॉब्लेम्सना निमंत्रण देणारी आहे. जर दीर्घायुषी व्हायचं असेल तर आवश्यक तेवढी विश्रांती, झोप शरीराला आणि हो, मनालाही हवीच! सकाळी जाग आल्यापासून आपलं मन लगेच काम करु लागतं, इतकंच नव्हे तर बऱ्याच जणांना रात्री देखील शांत,गाढ झोप लागत नाही. खूप एका मागे एक स्वप्नं पडत राहतात मग सकाळी उठवत नाही,उत्साह ,एनर्जी वाटत नाही, तनमनावर मरगळ येते.

आयुर्वेद सांगतो ,माणूस झोपतो म्हणजे नक्की काय होतं? आपल्या पाच इंद्रियांपैकी कोणतं ना कोणतं इंद्रिय हे जागेपणी सतत कार्यरत असतं.विशेषकरून डोळे, नाक आणि कान! आपण काहीतरी पहात असतो ,ऐकत असतो,कधी कधी आपल्याला स्वतःला काही ऐकायचं नसेल तरी आसपासचे आवाज कानावर पडत राहतात.कुठून तरी उजेड येत राहतो,कसले कसले हवे नकोसे वास येत राहतात ! मग अशावेळी खोलीतील लाईट बंद करून झोपायचा प्रयत्न केला तरी झोप लागत नाही. कारण आपली इंद्रिये आणि त्यांचे विषय म्हणजे दिसणं,ऐकू येणं, वास येणं वगैरे पासून मन वेगळं होऊ शकत नाही आणि जोपर्यंत ही मनाची निवृत्ती या विषयापासून होत नाही तोपर्यंत झोप येतच नाही.

कधीतरी तर आपण खूप थकलेलो असतो ,पट्कन छान झोपावं अशी इच्छा असते, पण आपलं मन मात्र खूप आनंदी किंवा चिंतीत,दुःखी असतं, कधी निराश असतं अशा वेळी कितीही प्रयत्न केला तरी निद्रादेवी प्रसन्न होत नाही कारण मनातील विचारांची आवर्तने थांबता थांबत नाहीत.

अशावेळी ध्यान,जप,पॉझिटिव्ह विचार ,डोक्याला तेल लावणं, संगीत ऐकणं,मित्रांशी बोलणं,ताण तणाव कमी करणं यासारखे उपाय योजावे लागतात तेव्हा झोप येते. झोप हा केवळ उपचार नसून तन आणि प्रसन्न आणि कार्यक्षम राहण्याचा महत्वाचा मार्ग आहे हे विसरून चालणार नाही.

“लवकर निजे, लवकर उठे , त्याला धन धान्य समृद्धी आणि आरोग्य मिळे” असं जे आपल्याकडे पूर्वापार म्हणत आलेत ते काही खोटं नाही. ज्याला हे सगळं हवंय त्यानं आपल्या वयाला अनुसरून योग्य ती झोप घ्यावी आणि आपलं स्वास्थ्य अबाधित राखावे हे मात्र खरं!

वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)
rajashree.abhay@gmail.com