मलावष्टंभ

अगदी साधा वाटणारा, बरेचदा इतरांना चेष्टेचा विषय असलेला पण अगदी रोज तापदायक ठरणारा असा हा त्रास आहे. तुम्ही निरोगी किंवा स्वस्थ असण्याची काही विशिष्ट लक्षणे आयुर्वेदाने सांगून ठेवली आहेत.सकाळी उठल्यावर फ्रेश वाटणे, उत्साह वाटणे याबरोबरच पोट व्यवस्थित साफ होणे हे अतिशय महत्वाचे आहे.

सकाळी उठल्यावर लगेच मलप्रवृत्तीचा वेग येणं हे अतिशय चांगलं लक्षण आहे. फार वेळ न लागता पोट साफ होणं, जोर करावा न लागणं, वारंवार जावं न लागणं ही चांगली लक्षणे आहेत. आपल्या कडे याविषयी पुष्कळ गैरसमज आहेत. जोपर्यंत दिवसातून 2/3 वेळा मलप्रवृत्ती होत नाही तोवर अशा लोकांना चैन पडत नाही.

पण हल्ली चुकीचा आहार,दिनचर्या यामुळे मलावष्टंभ ही तक्रार वाढतच चालली आहे. जेवणाच्या अनियमित वेळा, कोरडं खाणं, अति मसालेदार, चमचमीत खाणं, आंबवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ यांचा अतिरेकी वापर, उसळी, बेसन व त्याचे पदार्थ, फरसाण यांचा नियमित वापर यामुळे पचनाची प्रक्रिया बिघडून जाते आणि दिवसेंदिवस पोट साफ होण्यात अडथळे येऊ लागतात.

आहारात पाणी आणि स्निग्ध पदार्थांचा योग्य वापर किंवा प्रमाण असणं ही मल योग्य प्रकारे शरीराबाहेर टाकण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अन्नाचं पचन योग्य प्रकारे, योग्य वेळेत पूर्ण व्हावं यासाठी अन्नात ओलावा असणं गरजेचं आहे. पाणी आणि अन्न यांचं योग्य मिश्रण झालं की त्यावर पाचक स्रावांची ऍक्शन होऊन जठर, छोटं आतडे, मोठं आतडे यात पचनाची प्रक्रिया क्रमशः पूर्ण होते आणि शरीराला आवश्यक असणारा सारभाग रक्तात शोषला जातो. जो नको असणारा अपाचित मलभाग असतो तो घन स्वरूपात शरीराबाहेर फेकला जातो. आतड्यांच्या आतील बाजूस असणारी त्वचा स्निग्ध आणि ओलसर असणं गरजेचं आहे कारण तरच काही त्रास न होता मल मोठ्या आतड्यातून पुढे ढकलणे आणि बाहेर पडणे ही प्रक्रिया सोपी होते.

बऱ्याच जणांना पाणी खूपच कमी प्यायची सवय असते. त्यामुळे शरीर व एकूणच सगळे अवयव कोरडे पडतात. अन्न पचन होत असताना पाणी कमी पडल्यास अन्न कुजल्याप्रमाणे होते, त्यात विविध गॅसेस तयार होतात आणि मग पोट फुगणे, दुखणे, साफ न होणे, दुर्गंधीयुक्त गॅस बाहेर पडणे, खूप ढेकर येणे अशा अनेक तक्रारी निर्माण होतात. पचन पूर्ण झाल्यावर मलभाग तयार झाल्यावर त्यात थोडयाफार प्रमाणात असणारा ओलावाही आतड्याची अंतःत्वचा शोषून घेते आणि मल अजूनच कोरडा होतो मग तो सहजगत्या पुढे ढकलला जाऊ शकत नाही. तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, जोर लावावा लागतो आणि त्यातूनच कुंथण्याची सवय लागते जी अतिशय त्रासदायक असते. मलप्रवृत्ती खूप कोरडी होणं आणि जोर करणं हे नेहमीच सुरु राहिलं तर हळूहळू मूळव्याधीचा विकार निर्माण होऊ शकतो कारण जोर लावून लावून त्या नाजूक जागेच्या रक्तवाहिन्या फार ताण पडल्यानं सुजतात, फुगतात आणि मग प्रचंड वेदना निर्माण करतात.

कधी कधी रक्तवाहिन्या फुटतात आणि प्रत्येक मलप्रवृत्तीचे वेळी रक्त पडू लागते! जर गुदद्वाराच्या आसपासच्या नाजूक त्वचेवर खूप ताण पडला तर तिथे चिरा पडल्याप्रमाणे जखमा होतात आणि त्यातूनही रक्त येऊ शकते, आग आणि वेदना तर असह्य होतात.

जेवणात स्निग्ध पदार्थांचा पूर्ण अभाव हेही मोठं कारण आहे. जसे खूप तेलकट, तळकट खाणं चुकीचं आहे त्याचप्रमाणे अगदी स्नेह विरहित आहार घेणंही चुकीचं आहे. हल्ली हार्ट अटॅक, कोलेस्टेरॉल यांच्या भीतीमुळे जेवणातून चांगलं, शुद्ध तूप जणू हद्दपार केलं जातं, ज्याचा परिणाम म्हणून शरीरात खूप कोरडेपणा निर्माण होतो. वर्षानुवर्षे असा आहार घेतला गेल्यास त्याची परिणती मलावष्टंभ होण्यात होते.

खूप मैदा, साखर यांचा आहारात समावेश असणं हे ही एक कारण आहे. तंतुमय पदार्थांचा रफेजचा अभाव हेदेखील कारण आहे . हिरव्या भाज्या, कच्च्या भाज्या, फळं खाण्यात नसतील तर ही शक्यता अधिक असते. जेवणात पातळ, रस्सा भाज्या, आमटी, कढी, ताक या सारख्या द्रवपदार्थांचा अभाव असेल, दूध प्यायलं जात नसेल त्रास अजून तीव्र होतो.

यासाठी काय करता येईल ते पुढील भागात जाणून घेऊ. तुमच्या तक्रारी आणि त्रासांसाठी आजच आम्हाला भेटा आणि शास्त्रशुद्ध उपचारांचा लाभ घ्या.

-वैद्य राजश्री कुलकर्णी

M.D.( आयुर्वेद)