मलावष्टंभ – उपाय

मलावष्टंभ का होतो, ही सवय हळूहळू कशी वाढत जाते ते आपण पाहिलं. पण हा त्रास होऊ नये किंवा क्वचित झाला तर आटोक्यात कसा ठेवावा ते आता आपण पाहू!

आहार व्यवस्थित असणे ही फार गरजेची बाब आहे. अन्नपचन नीट व्हावं यासाठी पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. उगीचच दिवसभरात चार पाच लिटर पाणी पिणे आवश्यक नाही. पण जेवणात दोन ते तीन ग्लास पाणी मधून मधून प्यायला हवं जेणेकरून अन्न आणि पाणी यांची पेस्ट चांगली तयार होते आणि त्यावर पाचक रसाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते. पाण्याचं तापमान हीदेखील फार महत्वाची न वाटणारी परंतु महत्वपूर्ण बाब आहे. कायम बाराही महिने माठातील किंवा फ्रिजमधील पाणी पिणे हे जठराग्नी साठी हानीकारक आहे कारण त्यामुळे अग्नी मंद होतो व पचनाची क्रिया नीट होऊ शकत नाही.

आहारात थोड्या मात्रेत का होईना पण स्निग्धता गरजेची आहे. गायीचं किंवा घरी बनलेलं म्हशीचं तूप रोजच्या जेवणात असायलाच हवं. भात, पोळी किंवा वरण यासोबत एक एक चमचा तूप रोज घ्यायला हवं. ज्यांचं वजन जास्त आहे किंवा ज्यांना कोलेस्टेरॉल ची भीती वाटते त्यांनी गायीचेच तूप वापरावे. अधूनमधून घरी तयार केलेलं लोणी खायला हवं. सकाळी उपाशीपोटी कपभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास आतडी मृदू राहतात व पोट चटकन साफ होण्यास मदत होते. मलावष्टंम्भाची तक्रार असेल तर रात्रीचं जेवण लवकर करुन झोपताना दूध तूप एकत्र करुन प्यावे. तेल जेवणातील इतर पदार्थांमधून जसे, भाजी, आमटी, पोळी यातून जातच असते.

मलाला विशिष्ट आकार आणि घनता यावी यासाठी आहारात तंतुमय पदार्थ असणे गरजेचे आहे. नुसत्या कर्बोदकांमुळे मलप्रवृत्ती चिकट होते. यासाठी फळं, भाज्या रोज आहारात असायलाच हव्यात. पालेभाज्यांमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे अधूनमधून पालेभाज्या खायलाच हव्या. इतर फळभाज्या, फळे हेही सिझननुसार खावेत.

आहारात कोरडे पदार्थ फार नसावेत. चुरमुरे फरसाण, चिवडा, कोरड्या भाज्या नेहमी खाऊ नयेत. हरभऱ्याची डाळ व त्यापासून तयार होणारे वडे, भजी, फरसाण असे पदार्थ, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या उसळी, कडधान्ये हे वात वाढवणारे, कोरडेपणा वाढवणारे व मलावष्टंभ निर्माण करणारी असतात. त्यामुळे ज्यांना आधीच हा त्रास आहे त्यांनी उसळी नियमितपणे खाऊ नयेत. क्वचित आणि तीही हिरव्या मुगाची चालेल. आहारात द्रवपदार्थांचा अवश्य समावेश करावा.

मैदा आणि साखर यांचा वापर जितका कमी तितका उत्तम! विशेषतः बेकरीचे पदार्थ मलावष्टंभ करण्यात अगदीच कारणीभूत ठरतात म्हणून ब्रेड, पाव यांचा वापर कमीतकमी करावा.

शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. यामुळे त्या त्या ठराविक वेळी पाचक रस योग्य प्रमाणात स्रवतात आणि पचन चांगल्या प्रकारे पार पडते. साहजिकच मलप्रवृत्ती देखील योग्य वेळी सॉफ्ट व विनासायास होते.

बरेचदा हे आहारविहार यातील बदल करून देखील त्रास होत राहतो किंवा काही सारक चूर्ण घेतल्याशिवाय मलप्रवृत्ती होतच नाही असं सांगत रुग्ण येतात तेव्हा हा त्रास खूपच जुनाट झालेला असतो आणि त्यासाठी योग्य ते औषधोपचार करण्याची गरज असते. बरेचदा आतडी स्वच्छ करुन, त्यात चिकटलेला जुनाट मळ खरवडून काढण्याची गरज असते आणि त्यासाठी “बस्ती” हे पंचकर्म करावे लागते .

असे शास्त्रशुद्ध उपचार, औषधी योजना आणि प्रभावी पंचकर्म उपचार यासाठी आजच आमच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क साधा.

वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)
संपर्क – 0253 2322100