डोकेदुखी -उपाय

मागच्या लेखात आपण डोकेदुखी कशा कशामुळे होऊ शकते ते बघितलं. अनेक कारणांनी होणारं डोकेदुखी हे एक लक्षण असू शकतं. त्यामुळे नुसतं डोकं दुखतंय अशी तक्रार करत बसण्यात काही अर्थ नाही. त्याचं नेमकं कारण काय ते शोधून त्यावर योग्य तो उपाय केला गेला तरच डोकेदुखी पट्कन नियंत्रणात येते अन्यथा तक्रार सुरुच राहते.

उन्हात फिरणं, जागरण, उपास करणं, मसालेदार किंवा आंबट पदार्थ खाल्ल्याने डोकेदुखी उफाळत असेल तर ती बहुतांशी पित्त दोष वाढल्यामुळे होत असते. अशावेळी पित्त शामक औषधोपचार करुन घेण्याची गरज असते कारण त्याशिवाय पित्त कमी होत नाही. याशिवाय जी कारणं डोकेदुखी होण्याला जबाबदार आहेत ती टाळायला हवीत. तीव्र उन्हाच्या वेळा बाहेर जाण्यासाठी टाळाव्यात. सकाळी लवकर किंवा दुपारी चार वाजेनंतर काम मॅनेज करावे. जागरण टाळावं. अभ्यास किंवा काही अन्य काम असेल तर पहाटे लवकर उठून करावे. उपवास अजिबातच करु नयेत कारण उपाशी राहणं आणि शेंगदाण्यासारखे पित्ताकर पदार्थ खाणं यामुळे डोकेदुखी अजूनच वाढते. दही, लिंबू, चिंच हे आंबट पदार्थ खाऊ नयेत. बेकरीचे पदार्थ तसेच इडली, ढोकळा इ. आंबवलेले पदार्थ कमीच खावेत.

पित्ताचे प्रमाण जास्त असेल आणि ऍसिडिटी, डोकेदुखी या तक्रारी वारंवार उद्भवत असतील तर पंचकर्मातील वमन आणि विरेचन या शुद्धीक्रिया पित्ताची शुद्धी करण्यासाठी अवश्य करुन घ्याव्यात. आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये आम्ही गेल्या पंचवीस वर्षांच्या अनुभवांवर आधारित सर्व पंचकर्म उपचार अतिशय उत्तम प्रकारे करतो.

वारंवार प्रवास, डोक्याला वारा लागणे, हवेत खूप गारठा असणे, पावसात भिजणं यासारख्या कारणांनी शरीरातील वात दोष वाढतो आणि डोकं दुखू लागतं. यासाठी उष्ण उपचार करावेत ज्यामुळे पट्कन बरं वाटतं. प्रवास टाळणं शक्य नसेल तर प्रवासातून आल्यावर सगळ्या अंगाला गरम तेल चोळून तसेच डोक्यालाही गरम खोबरेल तेलाने मालिश करुन गरम पाण्याने अंघोळ करावी म्हणजे वात लगेच कमी होतो. प्रवासात कान, डोकं, नाक यांना वारा लागणार नाही याची काळजी घ्यावी. स्वेटर, मफलर, रुमाल बांधून घ्यावे. पावसात भिजू नये, चुकून भिजलच तर लगेच ओले कपडे बदलून घ्यावेत. आहारात गरम व ताज्या पदार्थांचा समावेश करावा. आलं टाकलेला गरम चहा प्यावा.

वात दोषावर उत्तम उपाय म्हणजे बस्ती हे पंचकर्म करुन घ्यावे. गरम तेलाने मालिश आणि वाफ यामुळे तसेच बस्तीमुळे वात लवकर नियंत्रणात येतो. वात प्रमाणाबाहेर वाढला असेल तर औषधं घेण्याचीही गरज आहे हे लक्षात घेऊन उपचार करुन घ्यावेत.

अर्धशिशी किंवा उन्हाच्या तिव्रतेबरोबर डोकेदुखी वाढणे ही लक्षणे असताना मात्र घरगुती उपाय फार उपयोगी पडत नाहीत तर त्याचं योग्य निदान करुन उपचार, पथ्य आणि औषधे हे सगळेच उपाय करणं गरजेचं असतं. बरेचदा नस्य हा पंचकर्मातील उपचार करणं ही आवश्यक असते.

डोळ्यांना नंबर असल्याने डोकं नेहमी दुखत असेल तर नंबर तपासून योग्य त्या नंबरचा चष्मा नियमित वापरणे तसेच डोळ्याचे व्यायाम करणे आवश्यक आहे.

मानसिक कारणांमुळे होणाऱ्या डोकेदुखीचा मात्र वेगळा विचार करावा लागतो. यात मनाचा विचार करुन मग त्यामुळे शरीरावर झालेले परिणाम आणि डोकेदुखी किंवा इतर शारीरिक त्रास यांचा एकत्रित विचार करून उपचार द्यावे लागतात. समुपदेशन किंवा कौंसेलिंग याचेही वेगळे महत्त्व आहे. ध्यान, जप यांचाही चांगला उपयोग होतो. काहीवेळा या रुग्णांना “ शिरोधारा” हे पंचकर्म करुन घेणे अनिवार्य असते. यामुळे सतत तणाव, न थांबणारे विचार, झोप न येणे, चिडचिड, इरिटॅबलिटी ही लक्षणे कमी होतात. हेडमसाज, तळ पायांना तेल चोळणे हे साधे उपाय घरीही करता येतात.

नेहमी ब्लडप्रेशर वाढल्याने डोकं दुखत असेल तर ब्लडप्रेशर कमी करुन नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना व औषधोपचार करणे आवश्यक असते. यातही शिरोधारा उपयोगी पडते.

ब्रेन ट्यूमर सारख्या गंभीर आजारामुळे डोकं दुखत असेल तर त्याचे वेगळे उपचार करणे गरजेचे आहे कारण साधी डोकेदुखी साठी बाजारात मिळणारी औषधे या गंभीर आजारांमध्ये उपयोगी पडत नाहीत. गरज पडल्यास शस्त्रक्रिया देखील करावी लागते.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती ही की जर वारंवार डोकेदुखी हे लक्षण जाणवत असेल तर ते दुर्लक्ष करुन टाळू नये. कशामुळे नेहमी नेहमी डोकं दुखतं याच्या मूळ कारणापर्यंत पोचून त्याचे योग्य ते उपाय करुन घेणे गरजेचे आहे अन्यथा कधी कधी गंभीर आजार नजरेतून सुटण्याची शक्यता असते.

वरील कोणत्याही स्वरुपाची डोकेदुखीसाठी योग्य निदान तसेच सर्व प्रकारचे पंचकर्म उपचार आमच्या “आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये” उपलब्ध आहेत, आजच संपर्क साधा.

वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)
संपर्क – 0253 2322100