कोरोना व्हायरस आणि आपण

मागच्या वर्षी साधारण डिसेंबर महिन्यात चीन मध्ये कुठलं तरी नवीन इन्फेक्शन वेगानं पसरत चाललंय अशा बातम्या येऊ लागल्या. आधी काय आहे, काय घडतंय, किती गंभीर आहे याचा काहीच अंदाज नव्हता. हळूहळू त्याचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं कारण हा एक व्हायरस आहे आणि तो जीवघेणा आहे हे लक्षात आलं. मग त्याचं कोरोना हे नाव वारंवार ऐकू येऊ लागलं.चीनच्या विशिष्ट प्रांतात तो जास्त आढळला. शास्त्रज्ञ या आजाराचा लगेच अभ्यास करु लागले.

पेशंट्सना काय लक्षणं दिसतात, किती दिवसांनी दिसतात ,त्यांचं गांभीर्य किती, जे पेशंट्स मृत्यू पावले ते किती दिवसांनी गंभीर झाले असा अभ्यास झाल्यावर याचे डिटेल्स बाहेर येऊ लागले. आजार जास्त पसरु नये म्हणून त्यांच्यासाठी लगेच वेगळी हॉस्पिटल्स उभारुन त्यांची चिकित्सा सुरु झाली. हल्ली जग अगदी छोटं झालंय, वेगवेगळ्या कारणांनी लोकं इकडून तिकडे, एका देशातून दुसऱ्या देशात फिरत असतात आणि मुख्य म्हणजे या व्याधींची लक्षणं actual इन्फेक्शन झाल्यानंतर लवकर दिसत नसल्याने हा व्हायरस अतिशय वेगाने जगभरात पसरला. मध्ये जवळजवळ पंधरा दिवस गेल्यामुळे असे पेशंट्स शोधणं, त्यांना थोपवून ठेवणं हे सगळंच अवघड होत गेलं. हळूहळू मृत्यू संख्या वाढत गेली. आता अनेक देशांनी येण्याजाण्यावर निर्बंध घातले आहेत पण तोपर्यंत एकूणच परिस्थिती गंभीर झाली आहे.

व्हायरस कसा पसरतो ?

  • ज्या व्यक्तीला आधीच इन्फेक्शन झाले आहे अशा व्यक्तीच्या शिंक, खोकला यातून बाहेर उडणाऱ्या थुंकीच्या तुषारांमधून हे व्हायरस दुसऱ्या व्यक्तीला इन्फेक्शन देऊ शकतात.
  • शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल किंवा कपडा न धरल्यास हातावर हे जंतू मोठ्या प्रमाणात येतात आणि मग ती व्यक्ती तिच्या हाताने ज्या ज्या ठिकाणी स्पर्श करेल तिथे जंतूंचा वेगानं प्रसार होतो.
  • जिना किंवा सरकत्या जिन्याचे हँडल्स, गाडीचे, घराचे, ऑफिसच्या टेबलचे, टॉयलेट्स चे हँडल्स अशा कोणत्याही धातूच्या संपर्कात आल्यावर हे विषाणू किमान दहा बारा तास जिवंत व ऍक्टिव्ह राहतात. कपड्यांवर पडले तर आठ ते दहा तास जिवंत राहतात.
  • या विषाणूंचं वैशिष्ट्य असं आहे की ते आकाराने इतर विषाणूंपेक्षा मोठे आणि जड आहेत त्यामुळे हवेत तरंगत राहून इन्फ्लुएन्झा सारखा त्यांचा प्रसार होत नाही तर ते हळूहळू जमिनीवर सेटल होतात.
  • साबण किंवा हँडवॉश, सॅनिटायझर यांच्या संपर्कात आल्यानंतर ते जिवंत राहू शकत नाहीत त्यामुळे दिवसातून चार पाच वेळा साबण लावून स्वच्छ हात धुणे हा एक प्रभावी, स्वस्त आणि सोपा उपाय आहे.
  • थुंकीच्या माध्यमातून प्रसार कमीतकमी व्हावा म्हणून तोंडावर मास्क बांधणं उपयुक्त आहे. पण याचा अर्थ मास्क बांधला नाही तर आपण फार धोका पत्करत आहोत असा होत नाही. अव्वाच्या सव्वा पैसे देऊन मास्क विकत आणण्याची गरज नाही. साधा स्कार्फ किंवा रुमाल किंवा घरी शिवलेला मास्क बांधला तरी चालेल. मास्क स्वच्छ असणं आणि ठेवणं गरजेचं आहे. रात्री झोपताना वगैरे हा काढलेला मास्क कुठेतरी जमिनीवर लोळत पडला तर त्याच्या वापरापासून फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता अधिक !
  • रोज गरम पाण्याने स्वच्छ अंघोळ करणं, नाक, डोळे, घसा साफ ठेवणं हे आरोग्याचे अगदी बेसिक नियम तर पाळायलाच हवेत.
  • काही नियम तर आपले आईवडील, आजी आजोबा पूर्वापार सांगत आले आहेत पण आता आधुनिकतेच्या नावाखाली आपण गुंडाळून ठेवले आहेत ते पुन्हा आचरणात आणणं गरजेचं आहे. जसे की, बाहेरून आल्यावर सर्वप्रथम चप्पल, बूट त्यांच्या ठरलेल्या जागेवर ठेवावेत, तसेच धूळ, माती, घाण लागलेले बूट घालून घरभर फिरू नये.
  • घरात वापरायच्या चप्पल वेगळ्याच हव्यात.
  • बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुतल्याशिवाय काही खाऊ पिऊ नये, अन्न, फळं, खाऊ किंवा अगदी लहान मुलांना देखील स्पर्श करू नये.
  • बाहेरचे कपडे बदलून ते घरी वापरायच्या कपड्यात मिक्स न करता वेगळे अडकवावे, घाम आला असेल तर पुन्हा न वापरता सरळ धुवायला टाकावेत. घरात सुती, स्वच्छ, सैल आणि कोरडे कपडे घालावेत.
  • एकमेकांचे कपडे, टॉवेल्स, नॅपकिन्स, हातरुमाल वापरु नयेत, कारण यामुळे केवळ कोरोनाच नव्हे तर इतरही श्वासनसंस्थेचे, त्वचेचे आजार किंवा इन्फेक्शन्स पसरण्याची शक्यता असते.
  • दिवसातून दोन तीन वेळा, विशेषतः बाहेरून कामावरून, शाळेतून, खेळून आल्या नंतर नुसत्या पाण्यानं हातपाय न धुता साबण लावून स्वच्छ धुणं गरजेचं आहे. खेळून आल्यावर तर हे फारच महत्वाचं आहे. गरज वाटल्यास अगदी गरम पाण्याचा वापर करावा.
  • आपल्या कळत नकळत आपला हात नाक, तोंड, डोळे या ठिकाणी स्पर्श करत असतो. आधीच विषाणू पसरले आहेत अशा ठिकाणी आपला हात चुकून लागला असेल आणि तोच हात नाक, तोंड इथे लागला तर कोरोना सारखे व्हायरस पट्कन शरीरात प्रवेश मिळवतात .
  • एका ताटात जेवणं, एकमेकांची उष्टी पेये पिणं, उष्टे ग्लास वापरणं हे आपल्याकडे सुरुवातीपासून च निषिद्ध आहे. यातून संसर्ग पट्कन पसरतो.
  • अंथरूण पांघरूण स्वतंत्र असणं आणि ते स्वच्छ ठेवणं याही आवश्यक बाबी आहेत.
  • नाक, घसा, तोंड हे मागच्या बाजूला एकमेकांना जोडलेले असतात त्यामुळे त्यांचं स्वास्थ्य आणि स्वच्छता राखणं गरजेचं आहे. काहीजणांना उठल्यावर तोंड न धुता बेड टी वगैरे घेण्याची सवय असते ती चुकीचीच आहे.
  • नियमितपणे थोड्या थोड्या वेळाने आठवणीने पाणी पीत रहावं, कोमट किंवा गरम पाणी प्यायलं तर अजून उत्तम, कारण उष्ण वातावरणात बहुसंख्य जीवजंतू मरुन जातात.
  • गरम पाणी, मीठ, हळद घालून गुळण्या कराव्यात म्हणजे घसा साफ राहतो.
  • सुंठ किंवा आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा, दूध आणि हळद, दूध आणि सुंठ, दूध आणि मध ही पेये उत्तम !
  • श्वासनसंस्था बळी पडत असल्याने सर्दी, खोकला होणार नाही आणि मूळची इम्युनिटी कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे दही, लिंबू, चिंच, लोणची यासारखे आंबट पदार्थ वारंवार खाऊ नयेत. फ्रिजचं थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम खाणं टाळावं, विशेषतः लहान मुलांना तर अजिबात देऊ नये.

या व्हायरस मुळे नक्की काय होतं?

  • या व्हायरसचं वैशिष्ट्य असं की एकदा कितीही कमी संख्येत हे नाक, तोंड या वाटे शरीरात प्रविष्ट झाले की प्रचंड संख्येने उत्पन्न होऊन अगणित वाढत जातात आणि जर शरीराची प्रतिकारशक्ती कमी असेल, वय कमी किंवा बरंच जास्त असेल तर ते श्वसन मार्गाच्या व्यतिरिक्त इतर अवयवांमध्येही वेगाने पसरतात.
  • सर्वप्रथम फुफ्फुसांवर अटॅक झाल्यामुळे श्वासोच्छ्वास घेण्याची प्रक्रिया अडखळत होतीय, श्वास कमी पडतोय, जीव गुदमरतोय अशी संवेदना रुग्णाला होऊ लागते.
  • सुरुवातीला कोरडा आणि मग चक्क फुफ्फुसाच्या मृत पेशी बाहेर घेऊन येणारा कफ असलेला ओला खोकला येऊ लागतो.
  • फुफ्फुसाच्या पेशी फटाफट मरतात आणि साहजिकच सर्व शरीरातील लहानमोठ्या अवयवांना ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता कमी कमी होत जाते आणि शरीरात, रक्तात विषार साठू लागतात.
  • ऑक्सिजन घेणं आणि कार्बन डाय ऑक्साईड बाहेर टाकणं हे महत्त्वाचं काम होऊ शकत नाही, तसंच रक्त शुद्धीकरण हे प्रमुख कार्यही पार पडू शकत नाही. परिणामी हळूहळू मल्टिपल ऑर्गन फेल्युअर ही स्थिती उद्भवते.
  • एकीकडे विषाणू वेगाने पसरत विनाशाचे काम करत असतात, मूत्रपिंड, फुफ्फुस, आतडी, हृदय, यकृत, प्लिहा असे सगळे व्हायटल ऑर्गन्स हळूहळू आपलं काम करु शकत नाहीत आणि परिणामी मृत्यू येतो.

आतापर्यंत याचा जो काही अभ्यास झाला आहे आणि काही निष्कर्ष निघाले आहेत ते पाहता,

उष्ण हवेत हे विषाणू फार काळ तग धरत नाहीत, त्यामानाने थंड हवेत ते जास्त सक्रिय राहतात असा एक निष्कर्ष आहे. भारताच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास आता सगळीकडे उन्हाळा सुरु होईल व वातावरण उष्ण असेल, ही एक दिलासादायक बाब आहे. याच विचाराने घसा दुखत असेल तर गरम पाणी पिणे हा उपाय बेसिक आहे. यासाठीच थंड गोष्टी टाळणं गरजेचं !

खास आयुर्वेदिक उपाय

  • थोडी जरी सर्दीची शक्यता वाटली तरी सुंठ घालून उकळलेले पाणी प्यावे.
  • सुंठ व गूळ व हळदएकत्र करुन त्याच्या हरभऱ्या एवढया गोळ्या करुन ठेवाव्या आणि सकाळी दोन गोळ्या चघळून खाव्यात
  • नाक चोंदलं किंवा बंद झालं तर उकळत्या पाण्यात निलगिरी तेलाचे थेंब टाकून वाफ घ्यावी.
  • नाक वहात असेल तर वाफ न घेता सुंठ, वेखंड, थोडं बाजरीचे पीठ आणि हळद तव्यावर कोरडेच टाकून त्याची धुरी घ्यावी.
  • घरात धूप, ऊद, गुग्गुळ यापैकी जे हाताशी असेल ते जाळावा, त्यात ओवा, वेखंड, लसणाची सालं टाकावीत.
  • लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींची प्रतिकारशक्ती टिकून रहावी यासाठी सकाळी एक चमचा च्यवनप्राश खायला द्यावा.
  • शरीरात साठलेला कफ बाहेर काढून टाकण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने “ वमन” ही शुद्धी क्रिया करुन घ्यावी .

हा आजार गंभीर किंवा जीवघेणा आहे अशी ज्या प्रमाणात भीती लोकांमध्ये आहे तितका तो प्राणघातक नाही. यापेक्षा कितीतरी अधिक पटीत भारतासारख्या देशात लोकं न्यूमोनिया, रोड ऍकॅसिडेंट यामुळे मरतात . थोडक्यात सांगायचे झाले तर याची भीती न बाळगता तो होऊच नये याची काळजी घेतली तर याचा सामना आपण समर्थपणे करु शकू हे मात्र नक्की !

वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D.( आयुर्वेद)