आला पाऊस…..

आला पाऊस…..

blog पाऊस आला की सगळी सृष्टी कशी ताजी, टवटवीत हिरवीगार होऊन जाते. चार महिने उन्हाचा तडाखा सहन करून त्रस्त झालेले पशू, पक्षी, माणसं सगळेच त्यामुळे आनंदाने पावसाचं स्वागत करतात. सगळं वातावरण चिंब ओलं, गारेगार होऊन जातं.

पण …..पण कधी कधी हा उत्साह, आनंद चारसहा दिवसांत मावळतो कारण पावसापाठोपाठ येणारे आजारपण! त्यातही बरेचदा दोष आपलाच असतो. आपण वातावरण बदललं तरी आपलं खाणं, दिनचर्या बदलत नाही. माठ, फ्रिजचं पाणी पिणं, थंड पाण्याने अंघोळ करणं, पंखा, ए. सी. ची गार हवा, आईस्क्रीम खाणं हे आणि यासारख्या अनेक गोष्टी आपण करत राहतो! त्यामुळे शरीरात अतिरेकी गारवा निर्माण होतो आणि कफाचे आजार त्रास देऊ लागतात. अंग दुखू लागतं, घसा धरतो, गिळायला त्रास होतो, सर्दी, खोकला, ताप सगळं एकामागे एक सुरू होतं आणि आपला आनंदच हिरावला जातो.

आधीच उन्हाळ्यात केलेल्या गार पदार्थांच्या सेवनाने शरीरात वात दोष साठून राहतो पण बाहेत वातावरणात उष्णता खूप असल्याने तो वात काही करू शकत नाही. पण एकदा का पाऊस पडला, हवा गार झाली की हा वात उफाळतो आणि चमक भरणे, मुरगळणे, उसण भरणे अशा तक्रारी निर्माण होतात. सांधे दुखू लागतात.

सलग काही दिवस पाऊस पडला की आयुर्वेदानुसार पाणी पचायला जड होते.त्यामुळे भुकेवरही परिणाम होतो. कधी कधी अग्नी मंद होतो, खावेसे वाटत नाही, खाल्लं तर ढेकर येतात, पोट फुगते, जळजळ होते, पोट व्यवस्थित साफ होत नाही.

या सर्व प्रकारच्या तक्रारींपासून दूर राहायचं असेल तर वर्षा ऋतूचे नियम पाळायला हवेत. ते कोणते? उद्या जाणून घेऊ.

वैद्य राजश्री कुलकर्णी
M. D.( आयुर्वेद)

Leave a Reply

Your email address will not be published.