आला पाऊस…..

blog पाऊस आला की सगळी सृष्टी कशी ताजी, टवटवीत हिरवीगार होऊन जाते. चार महिने उन्हाचा तडाखा सहन करून त्रस्त झालेले पशू, पक्षी, माणसं सगळेच त्यामुळे आनंदाने पावसाचं स्वागत करतात. सगळं वातावरण चिंब ओलं, गारेगार होऊन जातं.

पण …..पण कधी कधी हा उत्साह, आनंद चारसहा दिवसांत मावळतो कारण पावसापाठोपाठ येणारे आजारपण! त्यातही बरेचदा दोष आपलाच असतो. आपण वातावरण बदललं तरी आपलं खाणं, दिनचर्या बदलत नाही. माठ, फ्रिजचं पाणी पिणं, थंड पाण्याने अंघोळ करणं, पंखा, ए. सी. ची गार हवा, आईस्क्रीम खाणं हे आणि यासारख्या अनेक गोष्टी आपण करत राहतो! त्यामुळे शरीरात अतिरेकी गारवा निर्माण होतो आणि कफाचे आजार त्रास देऊ लागतात. अंग दुखू लागतं, घसा धरतो, गिळायला त्रास होतो, सर्दी, खोकला, ताप सगळं एकामागे एक सुरू होतं आणि आपला आनंदच हिरावला जातो.

आधीच उन्हाळ्यात केलेल्या गार पदार्थांच्या सेवनाने शरीरात वात दोष साठून राहतो पण बाहेत वातावरणात उष्णता खूप असल्याने तो वात काही करू शकत नाही. पण एकदा का पाऊस पडला, हवा गार झाली की हा वात उफाळतो आणि चमक भरणे, मुरगळणे, उसण भरणे अशा तक्रारी निर्माण होतात. सांधे दुखू लागतात.

सलग काही दिवस पाऊस पडला की आयुर्वेदानुसार पाणी पचायला जड होते.त्यामुळे भुकेवरही परिणाम होतो. कधी कधी अग्नी मंद होतो, खावेसे वाटत नाही, खाल्लं तर ढेकर येतात, पोट फुगते, जळजळ होते, पोट व्यवस्थित साफ होत नाही.

या सर्व प्रकारच्या तक्रारींपासून दूर राहायचं असेल तर वर्षा ऋतूचे नियम पाळायला हवेत. ते कोणते? उद्या जाणून घेऊ.

वैद्य राजश्री कुलकर्णी
M. D.( आयुर्वेद)

वसंत ऋतू आणि ऋतुसंधी
संक्रांतीचा सण झाला की दिवस मोठा होतो आणि थंडी कणाकणानं कमी होते आणि पुढे साधारण महिना सव्वा महिन्यात महाशिवरात्र झाली की ती पळून जाते असं आपल्या घरातील वयस्कर मंडळी त्यांच्या निरीक्षणावरून सांगतात, जे अगदी खरं आहे. आता बघा नं, फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच किती गरम व्हायला लागलंय. रात्री आणि पहाटे थोडी थंडी पडतेय. त्यामुळे नक्की काय करावं असं confusion होतंय. W. A. वर त्यावर जोक्स यायलाही सुरुवात झालीय.

आली दिवाळी
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा क्षण! नवीन कपडे आणि खाण्याची लयलूट!! ह्या आनंदमयी प्रकाशपर्वाच्या निमित्त सर्वप्रथम आयु:श्री परिवारा तर्फे आपणा सर्वांना खुप खुप आरोग्यदायी शुभेच्छा!

आयु:श्री आयुर्वेदीय हाॅस्पिटल व रिसर्च सेंटर च्या माध्यमातून गेली २५ वर्षांपासून रुग्णांच्या आरोग्याची काळजी घ्ण्यीचे व्रत अंगीकारलेले आहेच. त्यामुळे आरोग्यदायी दिपावली साठी आमच्याकडून काही खास आरोग्याच्या टिप्स!

दिवाळी पासून हिवाळा असे पर्यंत रोज अंगाला सुगंधी तेल व सुवासिक उटणे लावून गरम पाण्याने अंघोळ करणे यालाच अभ्यंग स्नान असे म्हणतात. हा केवळ दिवाळीचे चार दिवस करण्याचा उपक्रम नाही तर नियमित करण्याचा उपक्रम आहे. यामुळे त्वचा तजेलदार व सुंदर राहते, प्रतिकार क्षमता उत्तम काम करते.

फराळाचे पदार्थ बनवितांना सर्व घटक पदार्थ चांगल्या प्रतीचे वापरावे. हल्ली कुणाकडे वेळ नाही आणि क्षमताही नाही की पुर्वी सारखे सगळे फराळाचे पदार्थ घरी केले जातील! पण परंपरा तर पाळली गेली पाहीजे म्हणून मग फराळाचे पदार्थ विकतचे आणले जातात. तेव्हा चांगले पदार्थ वापरलेअसतील याची खात्री करुन मगच विकत आणावे.

गोडाचे पदार्थ तळण्यासाठी साजूक तूप वापरावे घातक डालडा नको. पदार्थ तळतांना तेल किंवा तूप तापले की आंच मंद करा त्यातून धूर येता कामा नये. फराळाचे सर्व पदार्थ पचायला जड असतात त्यामुळे एकावेळी फार खाऊ नयेत. चव बघण्याच्या निमित्ताने किंवा फराळाला कुणी बोलावले तर जास्त खालले जाऊ नयेत या साठी हा सल्ला.

फराळ ही देखील दिवाळीचे चार दिवस नव्हे तर हिवाळा असे पर्यंत करावयाची गोष्ट आहे. पहाटे लवकर उठून अंघोळ झाल्यावर लवकर भूक लागते अशा वेळी चटकन खाता येईल असे पौष्टीक पदार्थ म्हणजे फराळ. मात्र ते पचविण्यासाठी चांगली पचन शक्ति हवी. भरपूर व्यायाम हवा.

चिवडा, शेव यांत तिखट मसाले यांचे प्रमाण नियंत्रित ठेवा. अन्यथा अॅसिडीटी, जळजळ होऊन आनंदावर विरजण पडेल.

वैद्य अभय कुलकर्णी व वैद्य सौ राजश्री कुलकर्णी
आयु:श्री आयुर्वेदीय हाॅस्पिटल व रिसर्च सेंटर
३४, परब नगर, स्वामी समर्थ केंद्रा जवळ इंदिरानगर,
नाशिक ४२२००९

बाहेरचे खाणे
हल्ली बाहेर खाण ही एक अतिशय कॉमन गोष्ट झालीय, म्हणजे अगदी शाळेत जाणारी मुलं देखील आईकडून पैसे घेऊन बरेचदा घरून डबा वगैरे न नेता बाहेर गाडीवर, कॅन्टीन मध्ये खातात. मग मोठी मुलं, होस्टेलवर राहणारी मुलं किंवा नोकरी करणारे एकटे राहणारे यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको.

बाहेर खाण्याची कारणं अनेक प्रकारची आहेत. कधी बदल म्हणून, कधी चैन म्हणून, कधी घरी स्वैपाक करायचा कंटाळा आला म्हणून, कधी कोणत्या गोष्टीचं celebration म्हणून आणि कधी कधी नाईलाज म्हणून बाहेर खाल्लं जातं.
पूर्वी बाहेर जायची वेळ आली किंवा प्रवासाला जायचं असलं तर तहानलाडू, भूकलाडू असं सोबत करून घ्यायची पद्धत होती. बाहेर काही मिळत नसे. आता मात्र खाण्याचे पदार्थच काय तर प्यायचे पाणीही पैसे टाकले की कुठेही मिळत.अगदी ५ /१० रुपयांपासून हे पदार्थ कुठेही सहज उपलब्ध असल्याने ते अगदी जातायेता घेऊन खाल्ले जातात.

जे पदार्थ म्हणजे वेफर्स, चिवडा, चॉकलेट्स इ. बंद पाकिटात मिळतात त्यांची थोडी तरी खात्री देता येते, म्हणजे त्यांची quality, दर्जा यांची, पण जे पदार्थ ताजे बनवून विकले जातात त्यांचं मात्र कल्याण आहे अगदी. काल परवाच अहमदाबादला पाणीपुरी मध्ये toilet cleaner वापरल्याची बातमी वाचून आपण हादरलोच की !

बहुतेक वेळा बाहेर खायचं म्हंटल की पहिली पसंती चविष्ट, चमचमीत पदार्थांना असते. काहीतरी चटपटीत हवं असतं, मग अशा पदार्थांमध्ये वडापाव,समोसा,कचोरी, भेळ,पाणीपुरी, कच्छी दाबेली, मिसळ या आणि या शिवाय अनेक chinese पदार्थांचा समावेश होतो, म्हणजे noodles, मन्चुरिअन वगैरे. शिवाय बेकरीचे अनेक पदार्थ केक, पेस्ट्री, पिझ्झा, बर्गर हे ही असतात. खरी अडचण ही आहे की प्रत्येक व्यक्तीची खर्च करण्याची क्षमता वेगवेगळी असते आणि सहाजिकच त्यामुळे मिळणाऱ्या पदार्थाचा दर्जाही !!

तुम्ही रस्त्याच्या कडेला धूळ उडत असतानाही हे पदार्थ खाऊ शकता किंवा अगदी उत्तम, चकचकीत हॉटेल मध्ये A /C मध्येही बसून त्यांचा आस्वाद घेऊ शकता.

सर्वसामान्य जनता ही थोड्या पैशात हा आनंद विकत घेऊ बघते आणि फसते. अत्यंत हीन दर्जाचे बेसिक material वापरून केलेले हे पदार्थ आरोग्यासाठी घातक असतील यात काय शंका ?अनेक प्रकारची पिठ,तळायला तेल, त्यात वापरल्या जाणाऱ्या भाज्या, बटर,मसाले, कशा कशाचीही क्वालिटी बघायची कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नसल्यामुळे आपण नक्की काय खातोय हे कळायला मार्गच नसतो. मग पाणी कोणतं वापरतायत वगैरे तर दूरची गोष्ट !!

अतिशय व्यावसायिक विचार करून आणि फक्त जास्तीत जास्त फायदा मिळवण्याच्या हेतूने अनेक घातक पदार्थ मिसळणं, स्वच्छतेची अजिबात दखलही न घेणे, जी माणसं ते पदार्थ तयार करतात त्यांचं स्वास्थ्य कसं आहे, त्यांना काही आजार वगैरे नाहीत ना या कशाचाही विचार केला जात नाही हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फारच भयावह आहे.

सहज जातायेता मुलांनी हट्ट केला म्हणून आपण काहीही खाऊ घालतो आणि मग पोट बिघडणं, उलट्या जुलाब होणं, acidity, इतकंच नाही तर पाण्यातून पसरणारे टायफॉईड सारखे आजार देखील होऊ शकतात.

क्वचित बदल म्हणून खाणाऱ्यांना कदाचित हे दुष्परिणाम जाणवणार नाहीत पण जे नाईलाजाने रोज असं बाहेरचं अन्न खातायत त्यांना मात्र हे खूप त्रासदायक ठरू शकतं, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यातल्या त्यात चांगलं जे मिळेल, जरा कमी चवीचं पण घरगुती, आरोग्यपूर्ण असेल ते खायचा प्रयत्न करावा. घरी करून खाण शक्य असेल तर उत्तमच.

मुलांना याचे वाईट परिणाम समजावून सांगून ती कमीतकमी बाहेर खातील याचा प्रयत्न करायला हवा आणि आयांनी घरच्याघरी छान, चविष्ट पदार्थ करून खाऊ घालण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे नाही का ?

वैद्य राजश्री कुलकर्णी
M. D. (आयुर्वेद)
www.ayushree.com